आज जागतिक नदी दिवस

    0
    473

    मानवी संस्कृतीचा उदय आणि विकास नदीच्या काठी झाला. मानवाच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात नदीचे विशेष महत्व आहे. जगभरात प्रमुख सर्व शहरे नदीच्या काठी वसल्याची व विकास पावल्याचे आढळून येते. आदिम काळापासून माणूस नदीची पूजा करीत आला आहे. आजही काही आदिवासी समुदायांमध्ये नदी, झरे यांना पवित्र मानून त्यांची पूजा केली जाते. जगभरात सप्टेंबर महिन्यातील चौथा रविवार “जागतिक नदी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. मार्क अंजेलो’ (Mark Angelo) या जागतिक जलतज्ज्ञाच्या प्रस्तावानुसार संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक नदी दिवस साजरा करण्याचे निश्चति केले. संयुक्त राष्ट्राच्या या निर्णयानुसार २००५ मध्ये जगातील ६० देशांनी जागतिक नदी दिवस साजरा केला.

    नदी म्हणजे मोठ्या भूप्रदेशावरून एका दिशेकडून दुसरीकडे वाहत जाणारा नैसर्गिक रुंद थंड पाण्याचा प्रवाह. नदीचा उगम हा तलाव, मोठा झरा, अनेक छोटे झरे एकत्रित येऊन किंवा बर्फाच्छादित पर्वतापासून होतो. रचनेच्या दृष्टीने त्या भूप्रदेशातून जल निःसारण करणाऱ्या सर्व जल प्रवाहांची मिळून नदीप्रणाली होते आणि त्या प्रदेशाला त्या नदीचे खोरे म्हणतात.

    नदी ही बहुधा गोड्या पाण्याची बनलेली असते. आणि हे पाणी समुद्राच्या दिशेने किंवा क्वचित एखाद्या जलाशयाच्या दिशेने वाहत जाते. काही नद्या दुसऱ्या नदीला मिळून त्यांची अधिक मोठी नदी बनते. अति प्रचंड नद्यांना नद असे म्हणतात. उदा. ब्रह्मपुत्रा नद. कमी रुंदीच्या जलप्रवाहाला झरा, ओहोळ, नाला, किंवा ओढा म्हणतात. नदी असे म्हणण्यासाठी कोणतेही प्रमाणित नियम नाहीत. जेथे नदी समुद्राला मिळते तिथे तिची रुंदी जास्त असू शकते आणि पाणी खारटसर. नदीच्या या भागाला खाडी म्हणतात.

    नद्यांचे महत्त्व:-

    माणसाच्या गरजांसाठी तसेच इतर सजीवांना पाणीपुरवठा करण्यासोबतच नदीच्या निसर्गातील इतरही खूप महत्वपूर्ण भूमिका असतात. नदीमार्गातील दगड गोटे, खडक यांची झीज होऊन माती तयार होत असते. वाहत्या पाण्यात मृत वनस्पती, प्राण्यांचे अवशेष असे जैविक तसेच खनिजे, ऑक्सिजन असे अजैविक घटक मिळतात. या घटकामुळे नदीपरिसरातील माती सुपीक बनत असते. दगड गोटे व खडकापासून बनलेली माती नदी सपाट प्रदेशात आणून सोडते. नदी जेव्हा वाहत असते तेव्हा पाणी स्वच्छ व पिण्यासाठी आरोग्यदायी ठरेल अशी क्रिया करीत असते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण यातून वाढत असते. वेगवेगळ्या आकाराचे दगड गोटे, जाड, मध्यम व बारीक आकाराची वाळू यातून नद्या स्वच्छ, प्रदूषणमुक्त आणि वाहत्या राहिल्या तर नदीचे आरोग्य, पाण्याचे आरोग्य टिकून राहते. यातून नदी परिसरातील माणसाचे, इतर सजीव सृष्टीचे आरोग्य चांगले राहते.

    नदीला जपले तरच मानवाच्या जगण्यातील कोरडवाहूपण जाईल आणि समृद्धी आपोआप येईल. जी नदी आपणाला समृद्धी देते तिला घाण न करता तिची आपल्या परीने काळजी घ्यायला हवी. जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने नदीचे पूर्ण पावित्र्य जपत ती कधीही घाण करणार नाही अथवा त्यात प्लास्टिक, कचरा टाकणार नाही, ही शपथ सर्वांनीच घ्यावी.

    शीर कापली तर हृदय बंद पडून मृत्यू व्हायला वेळ लागत नाही अगदी त्याच पद्धतीने आपण नद्यांवरचं अतिक्रमण थांबवून पुुनरुज्जीवनाचे प्रयत्न केले नाहीत तर मानवी जीवनच धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. निर्माल्य आणि कारखान्यातून जाणारे केमिकलयुक्त पाणी नदीत सोडल्याने आज प्रचंड नुकसान होत आहे. कारखानदारांवर कारवाई करण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याने ही स्थिती उद‌्भवली. नदी वाचवण्यासाठी आज त्यांचा नैसर्गिक प्रवाह वाहू दिला पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.