देश कोरोनामुक्त करण्यासाठी गुढीपाडवा साजरा करूया

0
717

चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकालाच आहे. घरोघरी गुढी उभारून आणि गोड-धोड जेवण करून नववर्षाचे स्वागत दरवर्षी केले जाते. कोरोना साथीच्या प्रादुर्भावामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत.

करोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा, असा संदेश सर्वत्र फिरत आहे. नववर्षाच्या दिवशी होणारी वाहन खरेदी, सोने खरेदी, कपडे खरेदी बंद झाल्यामुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. गुढीपाडव्याच्या मंगल दिनी तुम्हाला पूर्ण कुटुंबासोबत संपूर्ण दिवस नवीन वर्ष साजरा करण्याची संधी मिळाली आहे.

यंदाच्या वर्षी कोरोना विषाणूला ठरविण्याचा संकल्प करणे अत्यावश्यक आहे. कोरोनामुक्त भारतासाठी यंदा गुढी उभारू या. आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबाच्या संरक्षणासाठी आणि देशवासियांच्या आरोग्य रक्षणासाठी अत्यंत साधेपणाने नववर्षाला सुरुवात केली पाहिजे. देशभरात या दिवसांत अनेक उत्सव साजरे केले जातात. सगळ्यांनी हे उत्सव उत्साहात साजरे करावेत परंतु, आपल्या घरातच… हे सणच आपल्याला या संकटातून बाहेर पडण्याची प्रेरणा देतील.

यंदाचा गुढीपाडवा साजरा करताना करोनाविरुद्धच्या लढाईत एकत्रित आलेल्या सर्व नर्स, डॉक्टर, मेडिकल स्टाफ, पोलीस कर्मचारी आणि मीडिया कर्मचारी यांना लक्षात ठेवून त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करू. कोरोनाला कसे कायमचे गुड बाय करता येईल यासाठी आपण सर्वांनी या निमित्ताने काम केले पाहिजे. म्हणूनच आता यादरम्यान सण साजरे करताना कोरोनाचा प्रादुर्भाव कसा कमी करता येईल ह्याचा विचार करूनच साजरे करूया.

तर चला यंदाची गुढी उभारू ती आपल्या देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी..

सर्वांना कोरोनामुक्त गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा