होळी आणि रंगपंचमी आनंदाने, उत्साहाने भरलेले आणि रंगांनी नटलेले सण आहेत. परंतू ह्या वर्षी होळीवर कोरोनाचे सावट आहे म्हणून रंग खेळताना गर्दीच्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. तसेच होळीनिमित्त खेळल्या जाणा-या रंगांमुळे त्वचेची आग होणं, डोळ्यांची जळजळ होणं, तात्पुरता आंधळेपणा येणे अशा अनेक समस्या निर्माण होतात.
- रंग खेळताना सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. आजकाल भेसळीच्या रंगामुळे शरीराचे खूप नुकसान होते. त्वचेला खाज सुटणे, शरीराला रंग लावल्यानंतर रंगात बदल होणे, रंग डोळ्यात गेल्याने अंध्यत्व येणे अशा परिणामांना सामोरे जावे लागते. त्यामुळे गुलालाने होळी खेळणे जास्त सोयीस्कर आहे.
- रंग खेळण्यापूर्वी आपल्या त्वचेवर सनस्क्रीनचा वापर जरूर करावा. त्यामुळे घराबाहेर उन्हामध्ये रंग खेळताना त्वचा सुरक्षित राहील. सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेवर भरपूर कोल्ड क्रीम किंवा खोबरेल तेल लावावे. त्यामुळे रंग खेळल्यानंतर त्वचेला येणारा कोरडेपणा येणार नाही, आणि त्वचेवरून रंग सहज उतरेल.
- सावधपणे एकमेकांना रंग लावावे. कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. आजकाल होळीसारख्या सणांना भांडण होण्याचे प्रमाण वाढले आहे.
- भरपूर पाणी प्या, म्हणजे तुमची त्वचा निर्जलीकृत अर्थात पाण्याचा अंश असेल आणि कोणत्याही केमिकल्सचा तुमच्या शरीरावर परिणाम होणार नाही.
- चेह-यावरचा रंग काढण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. हा रंग काढतानाही डोळे आणि ओठ बंद ठेवावेत.
- होळीचं सेलिब्रेशन संपलं की मगच अंघोळ करावी. कारण सारखं सारखं अंग किंवा केस धुण्याने तुमचे केस खराब होण्याची शक्यता अधिक असते. शाम्पूच्या अतिरिक्त वापरामुळे केसांनाही हानी पोहोचण्याची शक्यता असते.
- गर्दीमध्ये जाणे शक्यतो टाळा किंवा बाहेर जाताना मास्कचा वापर करा