यंंदा नवरात्रोत्सवही साधेपणाने; नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

0
295

राज्यात करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने थोड्याच दिवसांनी सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. येत्या ७ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवासाठी राज्य सरकारने सोमवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या. गेल्यावर्षांप्रमाणे यंदाही करोनाच्या पार्श्वभूमीवर गरबा, दांडियाच्या आयोजनावर बंदी घालण्यात आली असून मूर्तीची उंची आणि मंडपाच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

यावेळी ७ ते १५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे करोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवासाठी सरकार सज्ज झालं आहे. करोनाचा प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून नवरात्रीत गरबा किंवा दांडीया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गदी करुन उत्सव साजरा करू नये अशा सूचना राज्य सरकारतर्फे देण्यात आल्या आहे. नवरात्रोत्सव साजरा करताना नागरीकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे असे राज्य सरकारेन म्हटले आहे. त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकानुसार नवरात्रोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी पालिकेकडून पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून यासाठी ऑनलाइन सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा विनाशुल्क परवानगी देण्यात येत आहे. पालिकेने निश्चित केलेल्या आकारमानानुसारच मंडप परवानगी दिली जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता मूर्ती शाडूची असावी, सजावट पर्यावरणपूरक असावी, सार्वजनिक मंडळातील मूर्ती चार फूट उंचीची, तर घरगुती मूर्ती दोन फूट उंचीची असणेही आवश्यक आहे, असेही या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवाकरीता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याची व्यवस्था करावी. तसेच आरोग्य विषयक सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्षिशत करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच “माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रमे/ शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे.

गरब्याचे आयोजन करू नये

> नवरात्रोत्सवात गरब्याचे आयोजन करू नये.
> देवीच्या मूर्तींच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन किंवा फेसबुकद्वारे उपलब्ध करून देण्यात यावी.
> नवरात्रोत्सव मंडपांमध्ये थर्मल स्क्रीनिंगची पर्यायी व्यवस्था करण्यात यावी.
> नवरात्रोत्सव मंडपांमध्ये स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक असेल.
>मंडपाच्या मुख्य भागांचे दिवसातून तीन वेळा निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
>नवरात्रोत्सव साजरा करताना आरोग्य विषयक जाहिरातींसह सामाजिक संदेश देणाऱ्या जाहिरातींचा समावेश असावा, व्यावसायिक जाहिराती टाळा
> प्रसाद वाटणे, फुले अर्पण करणे, हार अर्पण करणे टाळावे.
> मंडळांन गर्दी टाळावी, गरब्याचे आयोजन करू नये.
>मंडळातर्फे रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी असे कार्यक्रम आयोजित करावेत.

विसर्जन मिरवणूक काढू नये

  • देवीच्या मूर्तीची विसर्जनाची मिरवणूक काढण्यात येऊ नये. विसर्जनाचा कार्यक्रम कमीतकमी लोकांमध्ये पार पाडावा.
  • लहान मुलांनी आणि वरिष्ठांनी सुरक्षेच्या कारणास्तव विसर्जनस्थळी जाणे टाळावे.
  • सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन धिम्या गतीनं नेऊ नये.
  •  विसर्जनादरम्यान वाहन थांबवून रस्त्यांवर भाविकांना देवीमूर्तीचे दर्शन घेऊ देण्यास सक्त मनाई आहे.
  • नैसर्गिक विसर्जनस्थळी देवीच्या मूर्तींचे विसर्जन करताना नागरिकांना थेट विसर्जन करण्याची परवानगी नाही.नागरिकांना मूर्ती जमा कराव्या लागतील. पालिकेमार्फत देवीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात येईल.
  • नैसर्गिक विसर्जन स्थळी प्रकाश योजना, जनरेटरची व्यवस्था केलेली असावी.
  • ध्वनी प्रदूषणाबाबत पालिकेच्या नियमांचे पालन करावे.