Navratri 2021 : नवरात्रीतील नऊ रंगांचे महत्त्व काय आणि यंदा कुठल्या दिवशी कुठला रंग?

0
552

नवरात्री हा हिंदू समाजासाठी एक शुभ सण आहे आणि तो अनेक देशांमध्ये साजरा केला जातो. नवरात्रीचा सण नऊ दिवस साजरा केला जातो ज्यात भक्त दुर्गा देवीच्या नऊ रुपांची पूजा करतात. मान्सूनोत्तर नवरात्री हिंदू चंद्र महिन्याच्या आश्विन शुक्ल पक्षात साजरी केली जाईल. नवरात्रोत्सवामध्ये रंगाचे महत्व असते. दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये नऊ वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. पाहूयात यावर्षीचे रंग कोणते आहेत.

नवरात्रीचे नऊ रंग आणि त्याचे महत्त्व :

पहिला दिवस (पिवळा रंग) : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळा रंग हा ज्ञान, विद्या, सुख, शांती, अध्ययन, विद्वता, योग्यता, एकाग्रता, मानसिक आणि बौद्धिक उन्नतीचे प्रतिक आहे. हा रंग मनामध्ये नवे विचार निर्माण करतो.

दुसरा दिवस (हिरवा रंग) : नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. हिरवा रंग विश्वास, उर्वरता, समृद्धी आणि प्रगतीचे प्रतिक आहे. हा रंग अनेक आजार दुर करू शकतो, असे मानले जाते.

तिसरा दिवस (तपकिरी किंवा राखाडी रंग) : तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. देवीच्या या रूपाला तपकिरी रंग आवडतो. तपकिरी रंग हा मेहनत आणि चिकाटीचे प्रतिक आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तपकिरी रंगाचा पोषाख परिधान करून चंद्रघंटा देवीची पूजा करावी.

चौथा दिवस (नारंगी रंग ): चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. कुष्मांडा देवीला नारंगी रंग आवडतो. नारंगी रंग हा गौरव आणि वीरतेचे प्रतिक आहे. असे मानले जातेस की, जर तुम्ही नवरात्रीच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून कुष्मांडा देवीची पुजा केली तर देवी प्रसन्न होते.

पाचवा दिवस (पांढरा रंग) : पाचव्या दिवशी स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. स्कंदमाता देवीला पांढरा रंग आवडतो. पांढरा रंग हा पवित्रता, शुद्धता, विद्या आणि शांतीचे प्रतिक आहे. या रंगामधून मानसिक, बौधिक आणि नैतिक स्वच्छता प्रकट होते. पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून स्कंदमाताची पूजा करावी.

सहावा दिवस (लाल रंग) : सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. कात्यायनी देवीला लाल रंग आवडतो. लाल रंग हा माणसाचे शारिरीक स्वास्थ हे सुंदर आणि आनंदीत ठेवण्यास मदत करतो.

सातवा दिवस (गडद निळा रंग): देवीचे सातवे रूप कालरात्री आहे. या रुपात ती विनाशाची देवी आहे तिला काली असे देखील संबोधिले जाते. तिची ही शक्तीशाली ऊर्जा निळ्या रंगात मूर्तिमंत झालेली आहे. कालरात्री देवीला निळा रंग आवडतो. निळा रंग हा बळ आणि वीर भावाचे प्रतिक आहे.

आठवा दिवस (गुलाबी रंग) : आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा केली जाते. गुलाबी रंग हा सार्वत्रिक प्रेम, आपुलकी आणि स्त्री आकर्षणाचे प्रतीक आहे. हा सुसंवाद आणि दयाळूपणाचा रंग आहे.

नववा दिवस (जांभळा) : सिद्धीदात्री हे देवीचे नववे रूप आहे. ती ज्ञानाची दात्री आहे आणि तुमचे मनोरथ पूर्णत्वास नेण्यास मदत करते. म्हणूनच जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा आणि शक्तीचे सांकेतिक आहे. हा रंग मनाला शांती देतो