पुण्यातील मानाच्या व प्रमुख गणेश मूर्तींचे विसर्जन उत्सव मंडपातच होणार

0
301
  • मानाच्या गणपतींच्या विसर्जनाच्या वेळा ठरल्या
  • घरी बसून ऑनलाईन विसर्जन पाहण्याचे केले आवाहन

पुण्याच्या गणेशोत्सवाच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेश विसर्जन मिरवणूक निघणार नाही. पुणेकरांनी अनंत चतुर्दशीला विसर्जन सोहळा ऑनलाईनच पाहावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरस च्या धोक्यामुळे अनेक प्रतिबंध आहेत. त्यामुळे गणेश भक्तांना विसर्जन स्थळी येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यानुसार यावर्षी मानाच्या व प्रमुख गणपतींची प्राणप्रतिष्ठापना व धार्मिक कार्यक्रम अत्यंत साधेपणाने केले जात आहेत. आता श्रीं चे विसर्जन देखील सांगता मिरवणूक न होता उत्सव मंडप व मंदिरातच होणार आहे. मानाच्या आणि प्रमुख गणपती मंडळाचे अध्यक्ष व पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक हा सर्वाधिक आकर्षणाचा विषय असतो. लांबलांबून लोक हा सोहळा पाहण्यासाठी येतात. पण या वेळी मिरवणूक नसेल. मानाच्या गणपती मंडळांनी भव्य मिरवणूक न काढता साधेपणाने विसर्जन करायचं ठरवलं आहे. महापालिकेवर ताण नको म्हणून विसर्जन हौदाची व्यवस्था मंडळं स्वतः करणार आहेत आणि त्यात गणेश मूर्तीचे विसर्जन करणार आहेत.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळानेही यावर्षी गणपती विसर्जन मंदिरातच करण्याचा निर्णय घेतलाय. विशेष म्हणजे दगडूशेठकडून हे विसर्जन सूर्यास्ताच्या आधीच करण्यात येणार आहे. दरवर्षी पुण्याची विसर्जन मिरवणूक कित्येक तास चालते, दगडूशेठचं विसर्जन होण्यास दुसरा दिवस उजाडतो. पण यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये आणि विसर्जनासाठी लोकांनी बाहेरच पडू नये यासाठी दगडूशेठ मंडळाकडून हा पुढाकार घेण्यात आलाय.

सूर्यास्ताच्या आधी मानाच्या गणेश मूर्तींचे विसर्जन होणार

परंपरेप्रमाणे पुण्याचे महापौर सकाळी 10.30 वाजता श्री कसबा गणपतीला हार घालतील व त्यानंतर सकाळी 11.30 वाजता कसबा गणपतीचे विसर्जन होईल. त्याचप्रमाणे श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीचे विसर्जन दुपारी 12.15 वाजता, श्री गुरुजी तालीमचा गणपती दुपारी 1 वाजता, श्री तुळशीबाग गणपती दुपारी 1.45 वाजता, केसरी वाडा गणपती दुपारी 2.30 वाजता, श्रीमंत भाऊ भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दुपारी 3.15 वाजता, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सूर्यास्ताच्या वेळी, अखिल मंडई मंडळाचा गणपती सायंकाळी 7 वाजता विसर्जन होईल.