पुण्यनगरीतील नवरात्र उत्सव आणि तेथील प्रसिद्ध मंदिर

0
387

नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. पुण्यामध्येही मोठ्या उत्सवात नवरात्र साजरी केली जाते. देवींना नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगाची साडी नेसवून वेगळ्या वाहनावर बसविले जाते. देवीची सजावट पाहण्यासाठी पुणेकर या देवळांना भेट देत आले आहेत. यंदा कोरोनामुळे नवरात्र उत्सव शांततेत साजरा करायला सांगितल्याने पुण्यात गरबा आणि दांडियाची मजा यावेळी नसणार आहे. तरीही ऑनलाईन का होईना पुणेकर दांडियाची मजा लुटत आहे.

पुण्याची ग्रामदेवता : तांबडी जोगेश्‍वरी
तांबडी जोगेश्‍वरी ही पुण्याची ग्रामसंरक्षक देवता. तांबड्या जोगेश्‍वरीचे देऊळ हे पुण्याच्या शहर भागात गजबजलेल्या वस्तीत आहे. ज्या काळात मूर्ती बसवली गेली तेव्हा ती वेशीबाहेर, म्हणजे त्या काळच्या पुण्याबाहेर होती. तेव्हा मंदिरही नव्हते. नुसती पाषाणाची मूर्ती होती. पुण्याची योगेश्‍वरी म्हणजेच जोगेश्‍वरी ताम्रवर्णी म्हणजेच तांबडी आहे. म्हणून तिला तांबडी जोगेश्‍वरी असे नाव प्राप्त झाले. या देवीची मूर्ती स्वयंभू. ती चतुर्भुज आणि उभी आहे.

पद्मावती मंदिर
पद्मावती मंदिर पुण्याच्या दक्षिण भागात पुणे-सातारा रस्त्यावर आहे. हे एकेकाळचे सहलीचे ठिकाण असलेले हे देऊळ व परिसर अनेक दशके बदलेला नाही. येथे देवी तांदळा म्हणजे स्वयंभू शिळेच्या रूपात आहे. मंदिर छोटे आहे. देवीच्या मंदिराच्या मागे गणपती, मारुती व शंकराची छोटी मंदिरे आहेत. बिबवेवाडीतील बिबवे कुटुंबीयांची पद्मावती ही ग्रामदेवता आहे. पुण्यात कोंढवा, कर्वेनगर, धायरी येथेही पद्मावतीची मंदिरे आहेत.

वाडे बोलाईची बोलाई देवी
वाडे बोलाई हे बोलाई देवीचे पुण्यानजीकचे प्रसिद्ध स्थान. पुणे शहरातही बोलाईचे मंदिर असून, ते जिल्हा परिषद चौकानजीक आहे. पूर्वी या मंदिरामागे तळे होते. इंग्रजांच्या काळात लष्कर विभागास पाणी उपलब्ध व्हावे म्हणून इंग्रजांनी बोलाई मंदिरामागील व गारपीरामागील तळे खोल; तसेच रुंद केल्याच्या नोंदी आहेत.

चतुः शृंगी मंदिर
चतुः शृंगी मंदिर ही एक लहान टेकडी आहे जी दुर्गा देवीला अर्पण केलेली आहे. या आधी तेथे अंबेश्वरी ही देवता होती. वर्षातून एकदा अश्विन महिन्यात येथे नवरात्री जत्रा भरते. हे देऊळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले. नाशिक जवळच्या वणीचे म्हणजेच सप्तशृंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:शृंगी देवी मंदिर.

महालक्ष्मी मंदिर

पुण्यातील सारसबाग जवळ महालक्ष्मी मंदिर प्रसिद्ध आहे. तीन देवी मातांचे स्वरूप असलेल्या या मंदिरात महालक्ष्मी माता, सरस्वती माता आणि महाकाली माता अशा तीन देवीची स्थापना येथे झाली आहे. नवरात्रात आवर्जुन पुणेकर येथे दर्शन करायला येतात. तसेच नवरात्रामध्ये येथे सजावटही खूप मोठ्या प्रमाणात केली जाते.

काळी जोगेश्‍वरी
बुधवार पेठेत दत्त मंदिराकडून डाव्या हाताला जाणाऱ्या रस्त्यावर काळी जोगेश्‍वरी आहे. या भागाला पूर्वी काळे वावर म्हणत यामुळे, तसेच मूर्ती काळ्या पाषाणात आहे म्हणून या देवीला काळी जोगेश्‍वरी नावाने ओळखले जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे कपाळावर मध्यभागी तिसरा डोळा आहे. तो आडवा आहे. सध्याची मूर्ती 1955 मध्ये स्थापन्यात आली.