राज्यात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना मागील पाच महिन्यांपासून सण उत्सव घरीच साजरे करावे लागले आहेत. आता आपला गणेशोत्सव देखील त्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे. पुणे शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा होणार्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाने एक निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना मंदिरातच होणार आहे. इतकी वर्षे कोतवाल चावडीत भव्य मांडव उभारून गणपती बाप्पाचे विराजमान तेथे होत असत. ही १२७ वर्षांची परंपरा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोना पार्श्वभूमीवर मंडळांने सामाजिक भान जपत हा निर्णय घेतला आहे. यंदाचा गणेशोत्सवर मंदिरामध्येच साजरा करण्याचे मंडळाने ठरवले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी अलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे. मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.
शासनाने दिलेल्या आदेशानुसार आपण यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने आणि मुख्य मंदिरात साजरा करीत आहोत. मंदिराच्या बाहेरून भाविकांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणोशोत्सवात भाविक गणरायाच्या चरणी मोठ्याप्रमाणावर हार, फुले, नारळ आणि पेढे अर्पण करत असतात. मात्र यंदा या वस्तूंचा स्वीकार केला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच ते पुढे म्हणाले की, या उत्सव काळात मंदिरात अभिषेक, पूजा, आरती आणि गणेशयाग गुरुजी करणार आहेत. तर भाविकांच्या हस्ते दरवर्षी उत्सव मंडपाच्या ठिकाणी होणारे अभिषेक रद्द करण्यात आले आहेत. मात्र भाविकांनी नाव आणि गोत्र यांची ऑनलाईन नोंदणी केल्यास, गुरुजींमार्फत ऑनलाईन अभिषेक करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच, दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेले कार्यक्रम देखील यंदा रद्द करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
असे होणार दर्शन
उत्सवकाळात दगडूशेठ गणपतीची आरतीही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-Live, iOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth_Android_App या लिंकवर उत्सवकाळात 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी आॅनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
दर्शनासाठी येणा-यांसाठी एलईडी स्क्रिनची व्यवस्था
श्रीं चे दर्शन घेण्यासाठी येणा-या भाविकांसाठी बेलबाग चौक आणि बुधवार चौक येथे एलईडी स्क्रिनची व्यवस्था करण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना लांबून देखील श्रीं चे दर्शन घेता येईल. तसेच मंदिरामध्ये व परिसरात कायमस्वरुपी असलेल्या 60 सीसीटिव्ही कॅमे-यांचा वॉच देखील राहणार आहे. याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना ट्रस्टतर्फे केल्या जाणार आहेत.