गुढीपाडवा २०२२: गुढीपाडव्याचा सण का साजरा करतात? काय आहे त्याचे महत्त्व?

0
209

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा किंवा कोणत्याही नवीन कामाचा आरंभ करण्यास हा मुहूर्त शुभ मानला जातो. नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इ. गोष्टी या दिवशी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा गुढी पाडव्यापासूनच प्रारंभ होतो.

गुढीपाडवा हा मानवी जीवनात नवचैतन्य भरतो. चैत्रात आसमंत हळूहळू गरम उष्णतेने भरू लागतानाच चैत्रपालवी झाडावर झळाळू लागते. फळांचा राजा आंबा याच काळात मोहरतो, फळतो आणि आपल्या रसाळ फळांनी सगळ्यांची रसना तृप्त करायला सज्ज होतो.

अंगणात मोगर्‍याचा सुगंध दरवळायला लागतो, आंबाही हिरव्या कंच पानांच्या शालूने नटतो, आंब्याची डाळ, पन्हे, हा सारा थाट, वसंताच्या आगमनाची चाहूल असते. असा हा गुढीपाडवा सगळ्यांच्या जीवनात वसंत फुलवतो.

गुढीपाडवा इतिहास

गुढी पाडवा या शब्दाचाही स्वतःचा वेगळा अर्थ आणि महत्त्व आहे. गुढी पाडवा दोन शब्दांच्या मिलनातून बनलेला आहे. जर आपल्याला गुढी या शब्दाचा अर्थ माहीत असेल तर आपल्याला ‘विजय चिन्ह’ चा मराठी अर्थ मिळतो आणि दुसरीकडे पाडव्या शब्दाचा मराठी अर्थ समजला तर आपल्याला ‘प्रतिपदा’ हा शब्द मिळतो.

महाभारतातील गुढीपाडव्याचा उल्लेख

महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणून अन्य राजेही काठीला शेल्यासारखे वस्र लावून, ती शृंगारून, पुष्पमाला बांधून तिची पूजा करतात.

महाभारतातल्या आदिपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथांतून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. ब्रह्मदेवाने याच दिवशी विश्व निर्मिले, असे मानले जाते.

विजयाचा प्रतिक म्हणजे गुढी पाडवा

गुढीपाडवा विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो. यामध्ये ‘गुढी’ म्हणजे ‘विजय ध्वज’ आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येक घरात विजयाचे प्रतीक म्हणून गुढी सजवली जाते. या उत्सवाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की या दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता. याच कारणामुळे शालिवाहन शकही याच दिवशी सुरू होतो.
गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली. या दिवसापासून सत्ययुग सुरू झाल्याचेही मानले जाते. पौराणिक कथांशी संबंधित अशी देखील एक मान्यता आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी भगवान श्री रामाने बळीचा वध करून दक्षिण भारतात राहणाऱ्या लोकांना त्याच्या दहशतीपासून मुक्त केले. यानंतर येथील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. ज्याला गुढी म्हणतात.
आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाले. या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनीही तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांग रचल्याचे सांगितले जाते.

आरोग्यदृष्ट्या गुढीपाडव्याचे महत्त्व

चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रातःकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. त्यामुळे पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे,धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधीगुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत असे आयुर्वेदशास्रात मानले जाते.

शरीराला थंडावा देणाऱ्या कडूनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यात घालणे, ती वाटून खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक समजले जाते.

घरातील ऐक्याचा प्रतिक म्हणजे गुढी पाडवा

गुढीपाडव्याला गुढी उभारून झाली की घरातील सगळे एकत्र जमतात. छान पारंपारीक वेशात सर्वजण नटलेले असतात. घरात गोडाधोडाचे जेवण असते. खास करून श्रीखंड पुरी किंवा पुरणपोळी हे दोन पदार्थ तर हमखास जेवणात दिसतात. पाहुणे सोयरे येतात आणि एकत्र कुटुंब जेवणाचा आस्वाद घेतात. नव्याने लग्न झालेल्या जोडप्याला गुढीपाडव्याला विशेष मान असतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढीपाडवा हा मंगल आणि साडे तीन मुहुर्तांपैकी एक सण मानला जात असल्या कारणाने या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

भारतातील विविध राज्याचा गुढी पाडवा

गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच साजरा केला जातो असे तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. कारण भारतभरात गुढीपाडवा साजरा केला जातो. पण साजरा करण्याची पद्धत आणि नाव मात्र वेगळे असते. आंध्रप्रदेश व कर्नाटक मध्ये याच दिवशी उगादी नावाने सण साजरा केला जातो. नवीन वर्षाचे स्वागत म्हणून अत्यंत हर्षोल्हासात दक्षिण भारतीय नागरिक हा सण साजरा करतात. सिंधी लोकं देखील याच दिवशी चेटीचंड नावाचा सण नवीन वर्षाचे स्वागत म्हणून साजरा करतात.