पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर – पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.
एकदा डिसेंबर महिना चालू झाला की,पोपटी बनवायला सुरवात होते.जास्त करून रायगड भागात आगरी कोळी लोक मोठ्या आवडीने ही पोपटी बनवतात.ही पोपटी खायला इतकी चविष्ट लागते की आपल्याला ही पोपटी बनवायला वेळ निवडावी लागत नाही.
पोपटी पार्टी प्रक्रिया:
पोपटी करण्यासाठी लागणार्या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात. पोपटीकरता वाल, मेदळ आणि तुरी तसेच शेवग्याच्या शेंगा, कांदे, बटाटे, वांगी वगैरे अख्खीच धुऊन घेतली जातात. बटाटे, नवलकोल आणि वांग्यांना धुऊन चिरा पाडतात. चिरा पाडलेल्या अलकोल, वांगी व इतर भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबरे, थोडे आले, लसूण घालून केलेले वाटण आणि मीठ व ओवा चोळतात. वाटण उरले तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तर वेगळीच चव येते. मटण वा चिकन असेल तर त्यालाही आले, लसूण, मिरची व कोथिंबिरीचे वाटण लावतात. या मोसमात भांबुर्डा ही वनस्पती ओसाड जागी व शेताच्या बांधावर उगवलेली असते. तिला एक विशिष्ट वास असतो. भांबुडर्य़ाचा जखमा भरण्यासाठी औषधी उपयोगही केला जातो. भांबुडर्य़ाचा पाला धुऊन घेतात. मडक्याच्या तळाला भांबुर्डा टाकून त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण वा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुडर्य़ाचा पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
हे मिश्रण शिजवण्यासाठी शेतातील एखादी जागा निवडण्यात येते. मोकळ्या जागी पोपटीचे मडके बसवण्यासाठी एक विताएवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडासा मोठा खड्डा खणला जातो. त्या खड्डय़ात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकून त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्डय़ात मडक्याचे तोंड असते. मडक्याभोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवऱ्या लावून त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण शिजवले जाते. तोपर्यंत जमलेल्या मंडळींचे मनोरंजनाचे खेळ आणि गप्पागोष्टी चांगल्याच रंगात आलेल्या असतात. कडाक्याच्या थंडीच्या दिवसांतच पोपटी पार्टी होत असल्याने कुटुंबातील लहानथोर पोपटीच्या शेकोटीजवळ शेक घेत बसतात. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपडतात. ‘चर्र्र’ असा आवाज आला की पोपटी शिजल्याचे समजते. पोपटीचा गरमागरम वाफाळता आस्वाद घेण्यासाठी सारे बैठक मारून सभोवार बसतात. मडक्याभोवतालची आग काठीने बाजूला सारून जाडी काठी खड्डय़ात मडक्याच्या तोंडाजवळ टाकून मडके बाजूस सारले जाते आणि जाड फडक्याने पकडून ते बाजूला केले जाते. बैठकीच्या मधोमध एका पेपरवर हे मडके ठेवून त्यातील वरचा भांबुडर्य़ाचा पाला काढला जातो.
ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.