कोरोनासाठी प्रशासन यंत्रणा सज्ज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0
357

संपूर्ण जभरात महामारी घोषित करण्यात आलेल्या कोरोनाचा महाराष्ट्रातही शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अशातच पुणे, मुंबई आणि नागपुरमध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून आल्यानं नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 11 कोरोना बाधीत आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. अशातच कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

कोरोनाबाबतचा राज्यव्यापी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातून सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, मुख्य सचिव अजोय मेहता आदी यावेळी उपस्थित होते.

कोरोनाचा धोका रोखण्यासाठी भारतात येणाऱ्या सर्व परदेशी पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलाय. १५ एप्रिलपर्यंत सर्व पर्यटक व्हीसांना सरकारने स्थगिती दिलीय. यातून केवळ डिप्लोमॅटीक व्हीसा, युएन व्हिसा आणि इतर ऑफिशिअल व्हिसांना वगळण्यात आलंय. जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे. आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तातडीने निर्माण करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिल्या.

पर्यटन कंपन्यांना पर्यटनासाठी नवे बुकिंग करु नये, असे आदेश दिले आहेत. तसेच सर्व यंत्रणांना कोरोना नियंत्रणासाठी सज्ज राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करा.प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष सुरु करावा. पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.