कोरोना व्हायरस; अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

0
314

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन समाज माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार, असा इशारा दिला होता. मात्र काही नागरिकांनी याची दखल घेतली नसल्याचे दिसून येतेय . जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरवल्याप्रकरणी पुण्यामध्ये एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर आजाराबाबत अफवा पसरवल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेला हा राज्यातलाही पहिलाच गुन्हा आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. माहिती मिळताच पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी माहितीची पडताळणी केली. त्यात माहिती खोटी असल्याचे उघड झाले. या प्रकरणी एकाविरोधात कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोनाची अफवा पसरवल्याबद्दल दाखल करण्यात आलेला हा पुण्यातील आणि राज्यातील पहिला गुन्हा आहे. कलम १८८, १८२, २९० आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याचं कलम ५१ ब आणि ५४ नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे.”

बीड जिल्ह्यातही गुन्हा दाखल
आष्टी इथे कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला, अशी खोटी बातमी प्रसरविण्यात आली होती, अशी माहिती आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. एम. सूर्यवंशी यांनी माहिती दिली. या बाबत व्हॉट्सअप स्टेटसमध्ये ज्या व्यक्तीचे नाव आणि फोटो वापरला होता त्याने पोलिसांकडे तक्रार केली होती. त्याआधारे पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढचा तपास सुरु आहे.