कोरोना व्हायरस; पुणे, मुंबई येथील सिनेमागृह, नाट्यगृह मध्यरात्रीपासून बंद

0
496

राज्यात करोनाचे १७ रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. कोरोना व्हायरसवर उपाययोजना म्हणून मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई आणि नागपूर या ठिकाणच्या व्यायामशाळा (जिम), नाट्यगृहे, जलतरण तलाव (स्विमिंग पूल) आणि चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संध्याकाळी विधानसभेत जाहीर केले. तसेच नागरिकांनी रेल्वे, बसचा प्रवास विनाकारण करू नये, मॉलमध्येही जाणं टाळावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळा बंद

पुण्यातील करोना रुग्णांची संख्या १० वर; ३११ रुग्ण देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील शाळा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबईतल्या शाळा मात्र सुरूच राहणार आहेत. याबाबत घेतलेले निर्णय आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले.

खासगी कंपन्यांनी वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी

राज्यात खासगी कंपन्या, कारखाने आणि संस्थांचे असंख्य कर्मचारी आहेत. अशा कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी शक्य असेल तर वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी. शक्य असेल तर आपल्या कर्मचाऱ्यांना घरातूनच काम करण्याची व्यवस्था करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी गर्दी करणे टाळावे, कोणताही सार्वजनिक कार्यक्रम आयोजित केला जाऊ नये, क्रीडा स्पर्धा घेतल्या जाऊ नयेत जेणेकरून गर्दी होणार नाही आणि कोरोना व्हायरस पसरणार नाही. राज्य सरकार राज्यातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.