संपूर्ण जगावर खूप मोठं संकट आलं असून यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांना नियमांचं पालन करणं आवश्यक असल्याच्या सुचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणातून दिल्या आहेत. रविवारी 22 मार्चला कोणीही घराबाहेर पडू नका असे यावेळी त्यांनी सांगितले. कोरोनाचा सामना करण्यासाठी देशात जनता कर्फ्यू करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. जनतेने जनतेसाठी लावलेला हा कर्फ्यू असेल. रविवारी, 22 मार्च सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा जनता कर्फ्यू असणार आहे. याचे जनतेने पालन करावे. या दरम्यान कोणीही घराबाहेर जाऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले.
“जनता कर्फ्यू म्हणजे जनतेसाठी जनतेकडून स्वत:वर लावण्यात आलेला कर्फ्यू”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. “या रविवारी म्हणजेच 22 मार्च रोजी सकाळी 7 वाजेपासून रात्री 9 वाजेपर्यंत सर्व देशवासियांना जनता कर्फ्यूचं पालन करायचं आहे. जनता कर्फ्यू दरम्यान कोणत्याही नागरिकाने घराबाहेर पडू नये. फक्त जे अत्यावश्यक सेवांशी जोडलेले आहेत त्यांनीच घराबाहेर पडावं”, असं मोदींनी आवाहन केलं.
सोशल डिस्टन्सिंग हा जनता कर्फ्यूचा उद्देश तर आहेच, पण त्याचसोबत आणखी एक उद्देश आहे तो म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा. कृतज्ञता कोणाप्रति तर आपल्या आरोग्यासाठी जे दिवसरात्र राबत आहेत ते डॉक्टर, नर्सेस अन्य आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी यांच्यासाठी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केलं त्यानुसार, या दिवशी ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सायंकाळी पाच वाजता पाच मिनिटांसाठी लोकांनी आपल्या घराबाहेर, खिडक्यांमध्ये, बाल्कनींमध्ये यावं आणि कृतज्ञता म्हणून टाळ्या किंवा थाळ्या वाजवाव्यात.
यासोबतच रेल्वेनंही २२ मार्च रोजी पूर्ण दिवस देशात ३ हजार ७०० ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेनं यासंबंधी परिपत्रकही काढलं आहे. तसंच मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि सिकंदराबाद येथील उपनगरीय रेल्वेच्याही किमान फेऱ्याच सोडण्यात येणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. २१/२२ मार्च मध्यरात्री १२ वाजल्यापासून २२ मार्च रोजी रात्री १० वाजेपर्यंत ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल २२ तास एकही ट्रेन चालवण्यात येणार नाही. परंतु सात तासांपेक्षा अधिक कालावधी प्रवास सुरू असलेल्या प्रवासी ट्रेनसाठी रेल्वेनं दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.