(कोरोनाला रोखण्यासाठी जलनेती क्रिया फायदेशीर पुण्यातील डॉक्टरांचा दावा)
कोरोनावरील लस अजूनही उपलब्ध नाही. कोरोनावरील लस कधी येणार याबाबतही सध्या केवळ अंदाजच लावले जात आहेत. अशा परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव रोखणं मोठं आव्हान आहे. मात्र, हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलनेतीचा उपाय परिणामकारक असल्याचा दावा पुण्यातील डॉक्टर धनंजय केळकर यांनी केलाय. तर सध्या बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय नक्की जलनेती आहे तरी काय? त्याबद्दलच आपण काही माहिती जाणून घेणार आहोत.
या उपचाराने कोरोना विषाणू नाहीसा होणार नाही, मात्र त्याचे प्रमाण नक्कीच कमी होते, असा दावा डॉक्टर केळकर यांनी केलाय. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. लक्षण विरहित कोरोना होईल, असंही डॉक्टर केळकर यांनी म्हटलं. डॉक्टर केळकर यांनी आपल्या या जलनेतीच्या उपचाराचा उपयोग रुग्णालयातील काही डॉक्टर नर्स आणि सफाई कर्मचारी यांच्यावरही केला. त्यांनी अशाप्रकारे 600 जणांवर उपचार केला. यापैकी कुणालाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला नाही.
जलनेती म्हणजे नक्की आहे तरी काय?
‘जलनेती’ हा भारतीय योग पद्धतीमधील अशी एक क्रिया आहे, जी श्वसन प्रणालीला बरे करण्यासाठी आणि अनुनासिक आणि श्वसनविषयक समस्यांपासून मुक्त होण्यासाठी केली जाते. हे करण्यासाठी खारट कोमट पाणी वापरले जाते. या क्रियेत पाणी नेती पात्राच्या मदतीने नाकाच्या एका छिद्रातून टाकून दुस-या नाकपुडीतून बाहेर काढले जाते. ही क्रिया समानपद्धतीने दोन्ही नाकपुडीतून केली जाते. या क्रियेद्वारे नाक शुद्ध होते, ज्यामुळे श्वसनमार्गाशी संबंधित समस्या, तीव्र सर्दी, दमा, श्वासोच्छवासाची समस्या दूर होते. जलनेती दिवसाच्या कुठल्याही वेळी केली जाऊ शकते. जर एखाद्यास सर्दी असेल तर आपण दिवसातून अनेक वेळा करू शकता.
जलनेती म्हणजे कोमट पाण्याने नाक आतील बाजूने धुण्याची पद्धत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका नाकातून श्वसनाद्वारे होण्याचा मानला जातो. मात्र, जिथून सर्वाधिक संसर्ग होतो तो नाकाचा आतील भाग धुतल्यास या व्हायरसचा संसर्ग बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आणता येईल.
कधी कराल ‘जलनेती’?
सकाळची वेळ ही ‘जलनेती’ करण्याची आदर्श वेळ समजली जाते. श्वसनाच्या आजारांमध्ये तुम्ही हा प्रयोग सकाळ-संध्याकाळ करु शकता. सर्दीमुळे नाक असेल किंवा खुपच चिकट स्त्राव असेल तर ‘जलनेती’मुळे तुम्हांला झटकन आराम मिळेल. कानाचे दुखणे बरे करण्यासही ‘जलनेती’ मदत करते.
जलनेती करताना तुम्हांला अडचण येत असल्यास.दिवसातून 3-4 वेळा हळूहळू जलनेती करा. म्हणजे सरावाने तुम्ही सहज ‘जलनेती’ करू शकाल.
जलनेतीचे फायदे:
- नाकातील चिकट स्त्राव व कीटाणू बाहेर पडण्यास मदत होते.
- दमा (अस्थमा), ब्रोनकायटिस, अशा आजारांपासून आराम मिळण्यास मदत मिळते.
- जलनेतीमुळे कानात होणारा संसर्ग तसेच कानांचे आजार कमी होण्यास मदत होते.
- एकाग्रता वाढवण्यास मदत होते.
- नियमित ‘जलनेती’चा प्रयोग केल्यास मानसिक व बौद्धिक समतोल सांभाळण्यास मदत होते.
- ‘धुम्रपाना’च्या व्यसनापासून तुम्हांला आराम हवा असल्यास जरूर ‘जलनेती’ करा.