डिप्रेशन म्हणजे नक्की काय? कशी कराल त्यावर मात?

0
975

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की फक्त 34 वर्षांचा सुशांत कोणत्या वेदनेतून जात होता, ज्यामुळे त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत गेल्या सहा महिन्यांपासून डिप्रेशन मध्ये होता आणि त्याच्यावर उपचारही सुरु होते. तर नक्की हे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य नक्की असते तरी काय आणि त्यामुळे आत्महत्या करण्याचा का विचार केला जातो याबद्दल आपण काही माहिती घेणार आहोत.

धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात नैराश्य किंवा उदासीनता हा आज बऱ्याच प्रमाणात आढळणारा मानसिक आजार आहे. १० ते २५ टक्के लोकांना आज डिप्रेशन म्हणजेच उदासीनतेने ग्रासलेले आहे. जीवघेणी स्पर्धा, आर्थिक टंचाई, एकमेकांशी बिघडलेले नातेसंबंध, त्यामुळे आलेला दुरावा, स्वतःला कमी लेखणे, नापास होणे, असफलता, धंद्यामध्ये नुकसान, पती-पत्नींचे न पटणे, घटस्फोट, मुलांची प्रगती न होणे, शारीरिक आजार अशी बरीच कारणे डिप्रेशन म्हणजेच नैराश्य या आजाराची असू शकतात. नैराश्य किंवा डिप्रेशन हा एक मानसिक विकार आहे जो एक गंभीर मानसिक आजार आहे. यामध्ये, व्यक्ती उदास राहते आणि नकारात्मक विचार त्याच्या मनात सतत येत राहतात. बर्‍याच वेळा एखाद्या व्यक्तीला परिस्थिती समोर असहाय्य वाटते आणि तो आयुष्य संपविण्याविषयी विचार करायला लागतो. उदासीनता झालेल्या व्यक्तीला सामान्य आयुष्य जगणे कठीण बनवते.

ही आहेत लक्षणे:

१. सतत उदास/ निराश वाटते किवा सतत चीडचीड होणे.
२. थकवा येणे, शक्ति नसल्यासारखे वाटते.
३. भूक कमी लागते, जेवणाची इच्छा न होणे किंवा वजन कमी होणे. काही लोकांमध्ये मात्र विरूध्द लक्षणे दिसू शकतात..
४. झोप न लागणे किंवा शांत व पुरेशी झोप न लागणे. काहीजणाना मात्र खूप झोप लागणे असाही त्रास होऊ शकतो.
५. कामावरती लक्ष न लागणे/ इच्छा कमी होणे, निर्णयक्षमता कमी होणे.
६. आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत करू शकणार नाही असे वाटते
७. आत्महत्येचे विचार मनात येणे किंवा प्रयत्न करणे.
८. दु:खी असणे, सतत काळजी करणे.
९. सतत रडू येणे
१० स्वतः बद्दल न्यूनगंड निर्माण होणे. स्वतःला दोषी समजणे. जसे, आपण काहीच कामाचे नाही, आपले काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणीही मदत
करू शकणार नाही असे वाटते.

डिप्रेशन वर मात कशी करायची?

  • कोणतीही मानसिक समस्या असल्यास तातडीने मानसोपचार तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. मात्र, काही व्यक्ती डॉक्टरांकडे जाण्यास लाजतात. लोक काय म्हणतील? असा विचार करतात. मात्र, असा विचार करण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • मनात सतत नकारात्मक विचार येत असतील तर जवळचे व्यक्ती, मित्र, नातेवाईक यांच्याशी बोलून मन हलकं करावं.
  • आपल्यासमोर एखादी नैराश्य ग्रस्त व्यक्ती असल्यास त्याच्याशी बोला, त्याला बोलते करा व त्यास मनोविकारतज्ञाची मदत घेण्यास प्रवृत्त करा.
  • आराम करत तणावाचे नियोजन करणे.
  • स्वतःसाठी वेळ देणे व छंद जोपासणे.
  • आपल्या विचारांतले निराशा निर्माण करणारे विचार शिधून त्यावर काम करणे
  • नियमित व्यायाम करणे