दोन हात कोरोनाशी; संपूर्ण देश २१ दिवसासाठी लॉकडाऊन

0
683

(पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा)

देशातल्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातल्या रुग्णांचा आकडा आज ५०० वर येऊन पोहचला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा देशाला संबोधित करत आज रात्री 12 पासून देशात संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पीएम मोदी म्हणाले, निष्काळजीपणा केल्यास भारताला याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल. ही किती मोठी किंमत असेल त्याचा अंदाजही लावता येणार नाही. येत्या २१ दिवसांसाठी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन असेल. कोरोनाच्या संक्रमणाचे चक्र तोडण्यासाठी हा कालावधी महत्त्वाचा आहे. यामध्ये आपण अपयशी ठरलो तर देश २१ वर्ष मागे जाईल. देशातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. २१ दिवसांचा लॉकडाऊन हा मोठा काळ आहे. मात्र, तुमच्या सुरक्षेसाठी, कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी महत्वाचा आहे. हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढील २१ दिवसांसाठी घरातून बाहेर पडण्याचा साधा विचारही करू नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

हिंदुस्थानाला वाचवण्यासाठी, प्रत्येक नागरिकाला वाचवण्यासाठी, तुमच्या कुटुंबाला आणि तुम्हाला वाचवण्यासाठी आज रात्रीपासून घराबाहेर पडण्यावर पूर्णपणे बंदी लावली जात आहे. राज्य, केंद्र शासित प्रदेश, प्रत्येक जिल्हा, गाव, वस्ती आणि गल्लीत सुद्धा लॉकडाउन केले जात आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यू आहे. जनता कर्फ्यूपेक्षा अधिक सक्तीचा. कोरोनाच्या विरोधात निर्णायक लढा देण्यासाठी हे पाउल उचलणे आवश्यक आहे.

घरात राहा, घरात राहा आणि एकच काम करा ते म्हणजे केवळ घरात राहणं… आजच्या निर्णयानं देशव्यापी लॉकडाऊननं तुमच्या घराच्या दरवाज्यावर एक लक्ष्मण रेखा आखलीय. सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. करोना संक्रमित व्यक्ती सुरुवातीला स्वस्थ असल्याचं दिसतं, तो संक्रमित आहे हे समजतदेखील नाही. त्यामुळे सावधानता बाळगा आणि आपल्या घरातच राहा. तुमचं घराबाहेर पडणं हे मृत्यूला आमंत्रित करणारं ठरेल. जगभरात हेच दिसून आलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर निघू नका असं तुमच्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून मी सांगतो आहे असंही ते म्हणाले. ज्या देशांनी अशा प्रकारचे उपाययोजना केली त्यांना थोडा फार दिलासा मिळाला आहे असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमेरिका आणि इटलीतील आरोग्य व्यवस्थेचाही दाखला दिला. सध्याच्या घडीला या दोन देशांतील आरोग्य यंत्रणा जगात सर्वोत्तम मानल्या जातात. मात्र, त्यांनाही कोरोनाला रोखण्यात अपयश आले. सुरुवातीला ६७ दिवसांत एक लाख लोकांना कोरोनाची लागण झाली. यानंतर दोन लाखांपर्यंतचा टप्पा अवघ्या ११ दिवसांत तर त्यानंतरच्या चार दिवसांतच कोरोनाग्रस्तांची संख्या तीन लाखांवर पोहोचली, याकडे लक्ष वेधत मोदींनी कोरोनाचे गांभीर्य अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला.

घरात राहून त्या लोकांबद्दल विचार करा जे सध्या आपला जीव धोक्यात घालून एक एक जीव वाचवण्यासाठी दिवस-रात्र रुग्णालयात काम करत आहेत. जान हैं, तो जहाँ है… धैर्य आणि अनुशासनाची हीच वेळ… देशात लॉकडाऊनची स्थिती असेपर्यंत आपला संकल्प पूर्ण करायचा आहे. घरातच राहिल्याशिवाय कोरोनाचा प्रसार थांबत नाही. घरात थांबणं हे फक्त रुग्णच नाही तर प्रत्येकासाठी गरजेचं आहे. तुमची एक चूक तुमच्या कुटुंबाला आणि देशालाही अडचणीत टाकू शकते. मी देशवासियांना आवाहन करतो, त्यांनी घरातच राहून या संकटाला परतवून लावण्यासाठी मदत करावी. ही वेळ धैर्यानं सामोर जाण्याची आहे. असंच दुर्लक्ष होत राहिलं तर भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागले. त्याचा अंदाज करणंही शक्य नाही. सगळ्यांनी सरकारच्या सूचनांचं पालन करा.