सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे .पुण्यात दुबईहून परतलेल्या दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. एक महिला व एका पुरुषाचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांच्यावर नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पुणे मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी रामचंद्र हंकारे यांनी दिली. या दोन्ही रुग्णांशी जास्तीत जास्त काळ संपर्कात असलेल्या आणखी तिघांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दुबईहून परतताना हे दोन्ही प्रवासी ओला कंपनीची मोटार भाड्याने घेऊन आले होते. त्या गाडीच्या वाहनचालकाचाही शोध घेण्यात आला आहे. त्याच्याही चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
कोरोनाचे दोन संशयित रुग्ण पुणे येथे आढळून आले. दोघांवर उपचार सुरू झाले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करायला लावलं आहे. काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. पुण्यातील सर्व खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांची सखोल माहिती घ्यावी. गेल्या काही दिवसांमध्ये कोणी परदेशात गेला होता का, याचाही माहिती घेण्यात यावी. उपचारांपूर्वी या नोंदी अवश्य कराव्यात आणि गरज असल्यास रुग्णाला नायडू रुग्णालयात पाठवावे. नागरिकांनी पुढील काही दिवस प्रवास करणे टाळावे. सार्वजनिक कार्यक्रमात जाणे टाळावे, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.