(राज्याची रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा दोन भागांमध्ये विभागणी)
देशव्यापी लॉकडाउन 4.0 संदर्भात महाराष्ट्र सरकारने मंगळवारी नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये राज्याला रेड झोन आणि नॉन रेड झोन अशा दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहेत. यातील रेड झोनमध्ये केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांना परवानगी दिली जाणार आहे. तर नॉन रेड झोनमध्ये दुकाने उघडण्याची आणि काही प्रमाणात सूट देण्याचा निर्णय झाला आहे. नवीन गाइडलाइन येत्या 22 मे पासून लागू केल्या जाणार आहेत.
सर्वाधिक महत्त्वाचा बदल म्हणजे पूर्वीचे झोन म्हणजे ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोन रद्द करुन यापुढे रेड झोन, नॉन रेड झोन आणि कंटेन्मेंट झोन अशा स्वरुपात ही विभागणी केलेली असेल. ज्या धर्तीवर संबंधित परिसरामध्ये लॉकडाऊनच्या नियमांची आखणी करण्यात आलेली आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर नियम अधिक कठोर असतील. जेथे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तर, रेड आणि ऩॉन रेड झोनमध्ये त्याचं स्वरुप काहीसं बदलेलं आहे.
राज्य सरकारनं लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता राज्यात केवळ दोनच झोन, अर्थात रेड झोन आणि नॉन रेड झोन असणार आहेत. मुंबईसह पुणे, सोलापूर, नाशिक, अमरावती, मालेगाव, औरंगाबाद, धुळे, ठाणे, कल्याण-डोंबिवली, जळगाव, अकोला, अमरावती हे भाग रेड झोनमध्ये असतील. उर्वरित जिल्हे नॉन रेड झोनमध्ये असणार आहेत.
रेड झोनमध्ये काय सुरू राहणार
- अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानं
- इतर दुकानांना परवानगी, त्याबाबत स्थानिक प्रशासन निर्णय घेणार
- स्थानिक प्रशासनाने परवानगी दिली तर दारूची दुकानं सुरू करता येणार, दारूची होम डिलिव्हरी करता येणार
- टॅक्सी, रिक्षा सेवा बंद राहणार
नॉन रेड झोनमधील नियम
- स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, स्टेडियम, खुल्या जागा वैयक्तिक व्यायामासाठी सुरू राहणार, पण सामुहिक जमावाला बंदी
- जिल्हांतर्गत बससेवा ५० टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यास परवानगी
- सलून सुरु ठेवण्यास परवानगी
- सर्व दुकानं आणि बाजारपेठा सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत सुरू राहणार, मात्र गर्दी झाल्यास हे बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासन घेऊ शकते.
- दुचाकीवर एकालाच परवानगी
- मॉल्स, परवानगी नसलेली दुकाने, परवानगी नसलेली इतर आस्थापनं साफसफाईसाठी सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळात सुरू ठेवू शकतात
- दस्त नोंदणी कार्यालय, आरटीओ कार्यालय सुरू करण्याची परवानगी
- विद्यापीठ, महाविद्यालयात उत्तरपत्रिका तपासणी, निकाल लावण्यासाठी ५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्यास परवानगी
खालील गोष्टींवर बंदी कायम असेल
- सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद
- 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये
- डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
- मेट्रोसेवा बंद राहणार
- शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद
- हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार
- सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
- रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्यक सेवा वगळता