Corona Vaccine : एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लस मिळणार

0
274

केंद्रीय मंत्रीमंडळाने ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यासाठी परवानगी दिली आहे. एक एप्रिलपासून सुरु होणाऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये ४५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व नागरिकांचे लसीकरण केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली. ४५ आणि त्याहून अधिक वय असणाऱ्या सर्वांनी लसीकरणासाठी नोंदणी करण्याचं आवाहन जावडेकर यांनी केलं आहे.

आतापर्यंत कोविड योद्धे, फ्रंटलाईन वर्कर्स, ४५ वर्षांवरील सहव्याधी असणारे रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यात येत होती. मात्र आता यात बदल करण्यात आले असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना १ एप्रिलपासून लस घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

भारताकडे मुबलक प्रमाणात लसी आहेत, अशी माहितीही केंद्रीय सूचना आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. याशिवाय दोन्ही लस सुरक्षित असल्याचंही जावडेकर म्हणाले आहेत. त्यामुळे मान्यता मिळालेल्या नागरिकांनी लवकरात लवकर नोंदणी करून लस घ्यावी, असं आवाहनही केंद्र सरकारतर्फे करण्यात आला आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट देशात जोर धरत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार कोरोनापासून कसा बचाव करता येईल यावर पूर्ण लक्ष देत आहे. त्यासाठी लस हा सर्वात उत्तम मार्ग आहे असेही जावडेकर म्हणाले.

पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य सेवा आणि करोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात आलं. त्यानंतर १६ फेब्रुवारीपासून ६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांचं लसीकरण सुरु करण्यात आलं. त्यानंतर एक मार्चपासून ४५ हून अधिक वय असणाऱ्या आणि इतर व्याधी असणाऱ्यांचं लसीकरण करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये करोना टास्क फोर्सचा सल्ला आणि वैज्ञानिक आधारांच्या सहाय्याने दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. त्यापैकी पहिला निर्णय म्हणजे ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व नागरिकांना करोनाची लस उपलब्ध होणार आहे, असं जावडेकरांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तसेच या बैठकीमधील दुसरा महत्वाचा निर्णय असा घेण्यात आला आहे की दोन डोसदरम्यान चार किंवा सहा आठवड्यांचा वेळ असावा असं निश्चित करण्यात आलं होतं. मात्र आता कोविशिल्डचा डोस चार ते आठ आठवड्यांच्यादरम्यान घेणं योग्य ठरेल असं संशोधकांना दिसून आलं आहे. त्यामुळे ही सवलतही देण्यात आली आहे, असंही जावडेकरांनी सांगितलं आहे. .