पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (७ जून २०२१ रोजी) देशातील नागरिकांशी करोनाच्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना नेजल व्हॅक्सिनचा उल्लेख केला. नेजल व्हॅक्सिनवर संशोधन सुरु असल्याचं सांगत मोदींनी हा शोध लागला तर त्याचा भरपूर फायदा होणार असल्याचं मत व्यक्त केलं. कोरोनाचं इंजेक्शन घेण्याची गरज पडू नये म्हणून नाकातून स्प्रे देण्यासाठी संशोधक कामाला लागले आहेत. त्यामुळे लवकरच ही नेझल व्हॅक्सीन देशवासियांसाठी उलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करोनाची तिसरी लाट ही मुलांसाठी धोकादायक ठरणार असल्याची भीती व्यक्त केली जात असतानाच नेजल व्हॅक्सिनचे महत्व वाढलं आहे. पण नेजल व्हॅक्सिन म्हणजे काय?, भारतात कोणती कंपनी याची निर्मिती करत आहे?, त्याचा काय फायदा होणार आहे? यासारखे अनेक प्रश्न नेजल व्हॅक्सिनसंदर्भात उपस्थित केले जातात. तर नक्की हे व्हॅक्सिन कसे असेल आणि कशाप्रकारे काम करेल याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
नेझल व्हॅक्सिन म्हणजे काय?
कोरोनाच्या दोन व्हॅक्सिनला मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही व्हॅक्सिन हातावर टोचण्यात येणाऱ्या आहेत. नेझल व्हॅक्सिन मात्र नाकातून सोडली जाणार आहे. नाकातूनच व्हायरसचा फैलाव होण्याचा सर्वाधिक धोका असल्याने नाकातून देण्यात येणारी ही लस परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे. कोणतीही लस नाकातून दिल्यास शरीरात इम्यून रिस्पॉन्स चांगला वाढतो. त्यामुळे नाकाद्वारे येणारे सर्व प्रकारचे इन्फेक्शन रोखले जातात, असं वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनच्या अभ्यासातून दिसून आलं आहे.
कशा प्रकारे कार्य करते नेझल वॅक्सीन?
नेझल स्प्रे वॅक्सीन इंजेक्शनऐवजी नाकाने दिली जाते. ही नाकाच्या आंतरीक भागात इम्युन तयार करते. हे अधिक प्रभावी मानले जाते कारण कोरोनासह बहुतेक हवा-जनित रोगांच्या संसर्गाचे मूळ प्रामुख्याने नाकाद्वारे असतं. आणि त्याच्या अंतर्गत भागांमध्ये रोग प्रतिकारशक्ती तयार करून, अशा रोगांपासून बचाव करण्यासाठी ते अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होतं.
नेझल वॅक्सीनचे 5 फायदे
1. इंजेक्शनपासून मुक्ती
2. नाकाच्या आतील भागात प्रतिकारशक्ती वाढवून, श्वसन संसर्गाचा धोका कमी होईल
3. इंजेक्शनपासून मुक्त असल्यामुळे हेल्थवर्कर्सला ट्रेनिंगची गरज नाही
4. कमी जोखमीमुळे मुलांना लसीकरण सुविधा देखील शक्य
5. उत्पादन सुलभतेमुळे, जगभरातील मागणीनुसार उत्पादन आणि पुरवठा शक्य