World Nurses Day : जागतिक परिचारिका दिन विशेष; नर्सेस हा आरोग्य यंत्रणेतील मजबूत कणा

0
717

आज 12 मे, जागतिक परिचारिका दिन. वैद्यकीय क्षेत्रातील रुग्णसेवेत प्रमुख भूमिका बजावणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. कोरोना संकटकाळात परिचारिका कोरोना वॉरियर्स बनून अहोरात्र रुग्णसेवा करत आहेत. आज जागतिक परिचारिका दिनानिमित्त जगभरात सुश्रुषा करीत असलेल्या सर्व परिचारिकांना मानाचा मुजरा. जागतिक परिचारिका दिन कधी सुरू झाला? यामागील कथा काय? जाणून घेऊया…

काय आहे इतिहास :

रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १२ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय किंवा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये आंतराष्ट्रीय परिचारिका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिक नर्सिंगच्या फाऊंडर लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्म ज्या तारखेला झाला, तो दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून घोषित करण्यात आला. तेव्हापासून संपूर्ण जगात १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

फ्लोरेन्स नायटिंगल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. तरीही त्यांनी आपले सर्व जीवन रुग्णसेवेला अर्पण करण्याचा निर्णय घेतला. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. लंडनमध्ये त्यांनी केलेल्या रुग्णसेवेमुळे सैनिकांचा मृत्यू दर ही ६९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आला होता. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करत असत. रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.

कोरोना वॉरियर्स नर्सेस (परिचारिका)

सध्याच्या कोरोना संक्रमणामध्ये नर्सेस अहोरात्र काम करत आहे. स्वतःचा आणि कुटूंबीयांचा विचार न करता रुग्णांची सेवा करणे आणि त्यांना लवकरात लवकर बरं करणे याच उद्देशाने त्या काम करत असून त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच. नर्स हा आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह मजबूत कणा समजला जातो. रुग्णांची सेवा करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी वेगवगेळे नाती निभावत नर्सेस काम करत असतात. काही नर्सेस तर आपल्या लहानग्या चिमुरड्याला (लहान मुलाला) घरी ठेवून आपले कर्तव्य बजावत असताना पाहायला मिळत आहे.

कधी कधी आरोग्य यंत्रणेतील नियोजनाच्या अभावामुळे किंवा त्रुटीमुळे काम करताना नर्सेसना खूप शारिरीक मानसिक ताणतणाव येतो. अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी साधनसामग्री, अपुरा लोकसहभाग, अपुरे अनुदान, असमान आरोग्य वितरण प्रणाली, योग्य वेळी माहिती मिळणे इत्यादीमुळे तसेच वाढलेले कामाचे तास, कामाच्या ठिकाणी अडीअडचणी, त्यामुळे सतत ताणतणाव येऊन मानसिक संतुलन भावनावर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती विचार शक्तीची कुवत काम करण्यास अपुरी पडू शकते. म्हणून नर्सेसच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नर्सेसच्या आरोग्याची काळजी घेणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कारण त्यांचे आरोग्य चांगले तरच त्या इतरांचे आरोग्य चांगले ठेवू शकतात. हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

काय म्हणावे आणि कसे बोलावे शब्द कमीच.तुम्ही मेहनती सेवेची मुर्ती आहात, सर्व काही तुमचे आश्चर्य आहे, मी मनापासून तुमचा आभारी आहे, तुम्ही मानवतेचे उदाहरण आहात. सर्व नर्सेस (परिचारिका) यांना मनापासून धन्यवाद आणि मनाचा मुजरा.

रुग्णांच्या सेवेसाठी सदैव स्वतःला झोकून देते
नर्सेस म्हणजेच माऊली विश्रांती कधी बरं घेते

जागतिक परिचारिका (नर्सेस) दिवशी शुभेच्छा
देताना छाती अभिमानाने आणि नम्रतेने फुलून येते…!!