Happy World Pharmacist Day: फार्मासिस्ट म्हणजे आरोग्य यंत्रणेचा एक अविभाज्य भाग

0
751

२५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय औषध संघराज्य (International Pharmaceutical Federation)ची स्थापना २५ सप्टेंबर १९१२ साली झाली आणि त्यांच्या २००९ साली तुर्की येथे झालेल्या परिषदेनुसार हा स्थापना दिवस जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला आणि २०१० पासून २५ सप्टेंबर हा दिवस जागतिक फार्मसिस्ट दिन म्हणून जगभरात साजरा केला जाऊ लागला.

खरंतर फार्मसीचे रीतसर शिक्षण घेतलेल्या व्यक्तीला फार्मासिस्ट असे म्हणतात. औषधविक्रीच नव्हे तर औषधनिर्मिती, संशोधन, मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च, हॉस्पिटल फार्मसी, रिटेल फार्मसी इत्यादी अनेक क्षेत्रात फार्मासिस्ट महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाचे स्वरूप वैद्यकीय क्षेत्रात फार मौल्यवान असूनसुद्धा समाजात जागरूकता आणि माहितीच्या अभावामुळे हवे तसे महत्त्व या क्षेत्राला दिले जात नाही.

बऱ्याच जणांना फार्मसिस्ट कोण व त्याची त्यांच्या आरोग्यासंदर्भात काय भूमिका आहे याबद्दल फरशी माहिती नसते. कित्येक लोकांना तर फार्मसिस्ट म्हणजे मेडिकलवला इतकंच माहिती आहे परंतु ही वास्तविकता नाही फार्मसिस्ट हा आरोग्ययंत्रणेतील एक महत्वपूर्ण घटक आहे व औषध निर्मितीपासून ते औषधाचे वितरण, औषध वापराबाबत रुग्णांना योग्य मार्गदर्शन, रुग्ण समुपदेशन, रुग्ण इतिहासाची नोंद करणे अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या तो पार पाडत असतो.

फार्मसिस्ट हा आरोग्य यंत्रणेतील एक महत्वाचा भाग असून त्याच्याशिवाय आरोग्य यंत्रणा ही अपूर्णच आहे. केवळ डॉक्टरांनी दिलेल्या औषधयोजनेनुसार औषध वितरण करणे इतकिच त्याची मर्यादित भूमिका नसून रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात त्याची भूमिका ही अत्यंत महत्वाची असते.

जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असताना अनेक फार्मासिस्ट दुकानदारांनी त्यांची दुकानं अहोरात्र त्यांची दुकानं खुली ठेवली आहेत. कुणी संसर्गाची भीती पाहता अनेकांना घरपोच औषधं पुरवली आहेत. तर अनेक फार्मासिस्ट कंपन्या आता लस उपलब्ध होई पर्यंत पर्यायी औषधं जास्तीत जास्त आणि स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत. फार्मासिस्ट देखील सध्या फ्रंटलाईन वर्कर्स प्रमाणे काम करत आहेत. त्यांच्यामुळे अनेक रूग्णांना, रूग्णांच्या कुटुंबियांना औषधं मिळणं, ती समजून घेणं सुकर होते. त्यामुळे डॉक्टर, परिचारिकांसोबतच आजारपणाला पळवून लावण्यासाठी मदत करणार्‍या फार्मासिस्टच्या कार्याचादेखील आज सन्मान करायला विसरू नका. मग अशा सार्‍यांना धन्यवाद म्हणण्यासाठी आजचा दिवस आहे.

मेडिकल स्टोअर वर आलेल्या कित्येक गरिबांना कसलाही मोबदला न घेता ते सहज मदत करत असतात. त्यांची ही सेवा रोज घडत असते, परंतु त्याची प्रसिद्धी करण्याची त्यांना गरज वाटत नाही. रुग्ण बारा होणे हेच त्यांच्यासाठी सर्व समाधान असते. किंबहुना त्यातच त्यांचे सुख दडलेले असते. अश्या सर्व फार्मासिस्ट बंधू भगिनींना आज फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
“तुम्ही आहात, म्हणून आरोग्य आहे. आरोग्य आहे म्हणूनच समाज सशक्त आहे.