निर्भयाला आज न्याय मिळाला; गुन्हेगारांना अखेर फाशी

0
446

7 वर्ष, 3 महिने 3 दिवसांनी दिल्लीतील निर्भयाला अखेर न्याय मिळाला आहे. आज (20 मार्च) पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहार जेलमध्ये चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. मुकेश सिंग (वय-32), पवन गुप्ता (वय-25), विनय शर्मा (वय-26) आणि अक्षय कुमार सिंग (वय-31) अशी या आरोपींची नावं आहेत. ७ वर्षानंतर निर्भयाला न्याय मिळाल्याने देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत असून आनंद साजरा केला जातोय.

निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवल्याच्या वृत्तावर तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी शिक्कामोर्तब केले. तिहार जेलमधील क्रमांक तीनच्या तुरुंगात त्यांना फाशी देण्यात आली आहे. फाशीनंतर डॉक्टरांनी चारही दोषींची रितसर मेडिकल टेस्ट घेतल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. तिहार तुरुंगाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत फाशीची शिक्षा रोखण्यासाठी निर्भयाच्या चारही दोषींनी प्रयत्न केला. दिल्ली उच्च न्यायालयानं रात्री १२.०० वाजेच्या दरम्यान ही याचिका फेटाळून लावत फाशीची शिक्षा कायम ठेवली. फाशी होताच जणू देशाला न्याय मिळाला अशी भावना सर्वच देशवासियांमध्ये होती. तुरुंग प्रशासनाने 7 मिनिटानंतर चौघांच्या मृत्यूची माहिती जारी केली. त्याच्या 30 मिनिटानंतर डॉक्टरांनी सुद्धा तपास करून दोषींना मृत घोषित केले.

निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया
आरोपींना फाशी दिल्यानंतर निर्भयाच्या आई आशा देवी यांनी मुलीच्या फोटोला आलिंगन दिले आणि म्हणाल्या – आज तुला न्याय मिळाला. आजचा सूर्य मुलगी निर्भयाच्या नावे आहे, देशातील मुलींच्या नावे आहे. मुलगी जिवंत असती तर मी एका डॉक्टरची आई म्हणून ओळखले गेले असते. आज निर्भयाच्या आईच्या नावाने ओळखले जाते. 7 वर्षांच्या लढ्यानंतर आज माझ्या मुलीच्या आत्म्याला सहनती मिळेल. आता महिलांना सुरक्षित वाटेल. २० मार्च हा दिवस निर्भयाच्या नावे, देशातील मुलींच्या नावे लक्षात ठेवला जाईल असेही त्या म्हणाल्या.