(भारतीय सैनिकांची भेट घेत देश तुमच्यासोबत सांगत सैनिकांचे मनोबल वाढवले)
पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक लेह दौऱ्यावर गेले आहेत. भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेला हिंसाचार आणि एलएसीवर वादाच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. गलवान येथे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचारात भारताचे 20 सैनिक शहीद झाले. तेव्हापासूनच दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा सुरू आहेत. या दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी सैनिकांचे मनोबल वाढवण्याबरोबरच भारत-चीन सीमेवरील सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच भारतीय संरक्षण दल प्रमुख बिपिन रावतही उपस्थित आहेत.
निमू येथे तैनात असणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांची मोदींनी भेट घेतली आहे. येथील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतला असून नक्की या परिसामध्ये कशापद्धतीने सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी मोदींना दिली. निमू येथे तैनात असणाऱ्या लष्कराच्या जवनांबरोबरच हवाई दलाचे अधिकारी आणि आयटीबीपी म्हणजेच इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्सच्या जवानांशीही मोदींनी संवाद साधला.
“भारतानं कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केलं आहे, आपलं आयुष्य वेचलं आहे. संपूर्ण जगानं आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानंच मानवतेचा विनाश केला आहे. आता विस्तारवादाचं युग संपलं असून जग विकासाकडे वाटचाल करत आहे,” असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला इशारा दिला. आज अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लडाख येथील निमू भागाचा दौरा केला आणि तिथल्या सैनिकांची भेट घेतली. त्यानंतर पंतप्रधानांनी जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोबलही वाढवलं.
पंतप्रधान मोदी यांनी लडाखमधील ज्या ठिकाणाला भेट दिले त्या ठिकाणाचे नाव नीमू असे आहे. नीमू हे लेहपासून द्रासच्या देशेला आहे. मोदी आज सकाळीच लडाखला पोहोचले. तेथे पंतप्रधानांनी लष्कर, हवाईदल आणि आयटीबीपीच्या जवानांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. हे सीमेवरील फॉरवर्ड लोकेशन आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना येथे लष्करी अधिकाऱ्यांनी घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. त्यावेळी तेथे मोठ्या संख्येने जवान उपस्थित होते.