भारत-चीन सैन्यामध्ये हिंसक झडप

0
276
  • भारताच्या कर्नलसह 2 जवान शहीद
  • चीनच्या ५ सैनिकांचा मृत्यू

पूर्व लडाखमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच काल रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली. यामध्ये दोन भारतीय जवानांसह एक अधिकारी असे तीन जण शहीद झाले. ७० च्या दशकानंतर पहिल्यांदाच चीनला लागून असलेल्या सीमेवर झालेल्या चकमकीत भारतीय जवान शहीद झाले आहेत.

एक वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, लडाख सीमेवरील तणाव निवळण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरू आहेत. लष्करी पातळीवर या चर्चा सुरू आहे. पीपी१४-१५-१७ वरून चीन पुन्हा माघारी फिरणार असल्याचे ठरले. मात्र, चिनी फौजांनी माघार घेण्यास नकार दिला. भारतीय जवानांनी देखील चीनच्या सैन्याला समजवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान दोन्ही सैन्यांमध्ये वाद वाढला आणि चिनी फौजांनी हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या महिन्याभरापासून पूर्व लडाखमध्ये तणाव आहे. चीन शांततेने चर्चेच्या माध्यमातून आपल्याला वाद सोडवायचा आहे असे सांगत आहे. पण तो मागे हटायला तयार नाही. एप्रिल महिन्यामध्ये नियंत्रण रेषेवर जी स्थिती होती, ती कायम करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.

मागच्या काही दिवसात दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनुसार चिनी सैन्य गलवान खोऱ्यातील पेट्रोलिंग पॉईंट १४,१५ आणि १७ ए मधून मागे हटेल असं ठरलं होतं. चिनी सैन्य मागे सरकत देखील होतं. पण पूर्णपणे त्यांना ताबा सोडला नव्हता. काल चिनी सैन्य पूर्णपणे माघारी फिरेल असा निर्णय झाला होता. दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये ठरल्यानंतरही चिनी सैन्याने मागे फिरण्यास नकार दिला. त्यानंतर ही हिंसक झडप झाली. यामध्ये चीनचे ५ सैनिक मारले गेले असून ११ सैनिक जखमी झाले आहेत.

भारत आणि चीन यांच्यात मे महिन्याच्या सुरूवातीपासूनच लडाख सीमेजवळ तणावपूर्ण वातावरण आहे. चिनी सैन्याने भारताने निश्चित केलेला एलएसी ओलांडला होता आणि ते गालवान व्हॅलीच्या पेनगाँग लेक जवळ आले आहे. चीनकडून येथे सुमारे पाच हजार सैनिक तैनात होते. याशिवाय अस्त्र-शस्त्र देखील मोठ्या प्रमाणात आणण्यात आले आहे.

भारतीय लष्कराकडून यासंदर्भात अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘‘सोमवारी रात्री गालवान परिसरात डी-एस्कलेशन प्रक्रिया सुरू होती. परंतु, याचवेळी अचानक हिंसाचार झाला. यामध्ये भारताच्या एका अधिकाऱ्यासोबतच दोन जवान शहीद झाले आहेत. सध्या दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावर चर्चा करत आहेत.” थोड्याच वेळात आणखी एकदा भारतीय लष्कराने संवाद साधला. त्यामध्ये चीन सीमेवरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. सोबतच, या चकमकीत दोन्ही देशांचे जवान शहीद झाले असेही सांगण्यात आले आहे.

चीनच्या मात्र उलट्या बोंबा

दरम्यान, चीनने भारताविरोधात बोंबा मारण्यास सुरुवात केली आहे. भारतीय सैन्यानेच चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय जवानांना प्राण गमवावे लागले असल्याचे चीनने म्हटले आहे. सीमावाद हा चर्चेतूनच सोडवण्यात येणार असल्याची भूमिका चीनने मांडली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, भारतीय सैनिकांनी दोन वेळेस सीमा ओलांडून चिनी सैनिकांना उकसवण्याचा प्रयत्न केला