राष्ट्रीय एकता दिवस का साजरा करतात?

0
498

स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144 वी जयंती (Sardar Vallabhbhai Patel Jayanti) आहे. दरम्यान भारतामध्ये त्यांच्या जयंती निमित्त 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो.

सरदार पटेल यांनी देशासाठी दिलेलं योगदान हे फार मोठं आहेच. त्यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात केलेल्या कार्यामुळे भारतीय जनतेच्या मनात आपलं एक वेगळं स्थान बनवलं आहे. भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री म्हणून त्यांची पहिली प्राथमिकता सर्व संस्थाने खालसा करुन ती भारतात विलीन करणे हे होते. यावेळी कोणताही रक्तपाताशिवाय त्यांनी देशातील अनेक संस्थानं खालसा केली.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘रन फॉर युनिटी’चे आयोजन करण्यात येते. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये व तद्नंतर अखंड भारताच्या निर्मितीसाठी दिलेल्या मौलिक योगदानाचा गौरव व्हावा व जनतेला त्यांची कामगिरी प्रेरणादायी ठरावी यादृष्टीने त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. भारत सरकारने 2014 पासून 31 ऑक्टोबर हा दिवस वल्लभभाई यांच्या जयंती स्मरणार्थ राष्ट्रीय एकता दिवस मह्णून साजरा करण्यास सुरूवात केली. 2 वर्षांपूर्वीच म्हणजे 31 ऑक्टोबर 2018 ला केवाडिया, गुजरात मध्ये वल्लभभाई पटेल यांचा ‘Statue of Unity’ उभारण्यात आला आहे. हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

आज सार्‍या जाती जमाती, धर्म,भाषा, बोली, प्रांत यांचं वैविध्य जपत भारतामध्ये लोकांनी एकत्र नांदावं यासाठी राष्ट्रीय एकता दिवस महत्त्वाचा आहे. सर्वांनी आपले जात धर्म विसरून माणुसकी हाच एक धर्म समजून एकत्र येणं गरजेचं आहे. राष्ट्रीय एकात्मता ही एक भावना आहे आणि ही भावना एखाद्या राष्ट्रातील किंवा देशातील लोकांमध्ये देशाबद्दलचे बंधुत्व किंवा आपुलकी दर्शवते.

राष्ट्रीय एकात्मता देशाला मजबूत आणि संघटित करते. राष्ट्रीय एकात्मता ही ती भावना आहे जी विविध धर्म, पंथ, जाती, पोशाख, सभ्यता आणि संस्कृतीच्या लोकांना एकाच धाग्यात एकत्र बांधून ठेवते. आज पुन्हा एकदा राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव देणारे प्रभावी सामूहिक नेतृत्व उदयाला येणे जरुरीचे आहे. प्रत्येक भारतीयात राष्ट्रीयत्वाची भावना प्रज्वलित झाली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचे हे बाळकडू प्रत्येक भारतीयाला मिळाले, तरच आमच्यातील विद्वान तरुण भारताच्या विकासासाठी पुढाकार घेतील.