१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन: जय हिंद जय भारत

0
403

स्वातंत्र्य दिवस हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

कोणत्याही देशासाठी स्वातंत्र्यदिन म्हणजे एक अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. या विशेष पर्वणीला, जुलमी ब्रिटिश राजवटीच्या पंज्यापासून मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली जाते. सर्वप्रथम व्यापारासाठी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी टप्प्याटप्प्याने संपूर्ण भारताचे शासन काबीज केले.१५ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्रीच्या ठोक्यावर भारताने ब्रिटिश राजवटीच्या शृंखला तोडून स्वातंत्र्य मिळवले. ती सबंध देशभरासाठी उत्सवाची रात्र ठरली.१५ ऑगस्ट म्हणजेच भारताने स्वातंत्र्य मिळवलेल्या दिवशी देशभर ध्वजारोहण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम ठेवून स्वातंत्र्यदिन साजरे केले जातात. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर प्रमुख कार्यक्रम असतो. तेथे पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण होते आणि तोफांनी ध्वजाला सलामी दिली जाते.

माऊंटबॅटन योजना :
मार्च १९४७ मध्ये र्लॉड लुई माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.
भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती. देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले. यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली. अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा :
माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.

स्वातंत्र्याची घोषणा :
नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात १४ ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती. मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या. ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.

भारताचे स्वातंत्र्यतेचे स्वप्नं साकार झाले ते फक्त सर्व देशवासीयांच्या एक होवून इंग्रजांविरूध्द लढण्यामुळेच आपण आपला हक्क मिळवू शकलो. त्यामुळे आपणही आपले सर्व हेवेदावे विसरून एकतेच्या सूराने आपल्या देशांस विकासाच्या दिशेने जलद गतीने वाटचाल करावयास समर्थ असावे. महात्मा गांधीनी देशास अहिंसा आणि शांतीच्या महान मार्गाने आपले स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांचे कार्य इतिहासात प्रेरणेचा एक झरा मानला जातो.

भारत आपणां सर्वांची मातृभूमी आहे. आपण या विशाल स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत. आपल्या देशासमोर अनेक बिकट समस्या आहेत त्यामुळे त्या समस्यांना गंभीरपणे आणि एकतेच्या सूत्राने आपणांस समर्थपणे तोंड दयावे लागेल.

आपणां सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खुप खुप शुभकामना. आशा करतो की आपला देश प्रत्येक क्षेत्रात आपला विकास साधून जगात आपला एक आदर्श निर्माण करेल . . . जयहिन्द ! जयभारत !