खासगीकरणा विरोधात बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवस देशव्यापी संप;चेक क्लिअरिंग ठप्प, ग्राहकांची गैरसोय

0
416

सरकारी बँक खासगीकरणाला विरोध करण्यासाठी सार्वजनिक बँकांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नऊ संघटनांनी दोन दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांचा हा संप आज सकाळी 6 पासून उद्या रात्री 12 पर्यंत असणार आहे. आयडीबीआयसह इतर दोन बँकेच्या खाजगिकरणाबाबत जी घोषणा सरकारने केली, त्याला या संघटनानी विरोध केला आहे.

या संपात जवळपास 10 लाख कर्मचारी सहभागी होणार आहेत. ज्यामुळे देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयसह प्रमुख सरकारी बँकांच्या सेवेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. या संपामुळे बँकाच्या अनेक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. शुक्रवार वगळता पाच दिवस बँका बंद असल्याने ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करावा लागतोय. बँकेचा संप असला तरी तुम्हाला तातडीचे आर्थिक व्यवहार डिजीटल माध्यमातून करता येऊ शकतात. देशभरातील जवळपास दहा लाख तर महाराष्ट्रातील सुमारे पन्नास हजार कर्मचारी आजच्या या संपात सहभागी होतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

बँकांकडून संपाबाबत ग्राहकांना पूर्वकल्पना

दरम्यान, स्टेट बँकेसह इतर बँकांनी आपल्या ग्राहकांना याबाबत आधीच माहिती दिली आहे. कर्मचाऱ्यांचा जर संप होईळ तर त्याचा बँकेच्या कामकाजांवर परिणाम होईल. बँकेच्या प्रत्येक शाखेतील कामकाजावर त्याचा प्रभाव पडेल, असं ग्राहकांना आधीच सूचित करण्यात आलं आहे. तसेच कामकाज सुरळीत चालावे यासाठी योग्य पावलं उचलू, असं आश्वासन बँकांकडून देण्यात आलंय.

दोन बँकांचं विलगीकरण होणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर केलं तेव्हा देशातील दोन बँकांचं खासगीकरण केलं जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. देशात सध्या 12 सरकारी बँक आहेत. यापैकी दोन बँकांचं खासगीकरण केलं तर देशात फक्त दहा बँक सरकारी राहतील. विशेष म्हणजे गेल्या चार वर्षात 14 सार्वजनिक बँकांचं विलनीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.

सरकारी बँंक कर्मचाऱ्यांचा संप; बँंक व्यवहारांसाठी ‘हे’ आहेत पर्याय

या संपात बँकेत काम करणारे सफाई कर्मचारी ते शाखा व्यवस्थापक सर्व श्रेणीतील अधिकारी सहभागी होत असल्यामुळे संप शंभर टक्के यशस्वी होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी कामगार संघटनांनी सलग दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे. आजपासून सुरु झालेल्या संपात ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्पलॉइज फेदरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटना सहभागी होत आहेत.