पर्व संपले : देशाची शान स्वर कोकिळा लता मंगेशकर यांचे निधन

0
454

गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.

लता मंगेशकर यांच्या आवाजाने सात दशकांहून अधिक काळ संगीत विश्व गाजवले आहे. भारतातील ‘स्वरसम्राज्ञी’ लता मंगेशकर यांनी 20 भाषांमध्ये 30,000 गाणी गायली आहेत. लता मंगेशकर यांचा आवाज ऐकून कधी कुणाच्या डोळ्यात पाणी आले, तर कधी सीमेवर उभ्या असलेल्या जवानांना आधार मिळाला. लतादीदींनी स्वत:ला पूर्णपणे संगीतासाठी वाहून घेतले. भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायिका म्हणून त्यांची ओळख आहे.

लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे ठेवण्यात आले होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांनी लता नाव ठेवल्याचे म्हटले जाते. दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हरपलं आणि अवघ्या 13 व्या वर्षी छोट्या लताची लतादीदी झाली. लतादीदींनी वयाच्या १३ व्या वर्षी गायनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले होते. १९४२ मध्ये त्यांनी पहिले गाणे रेकॉर्ड केले होते. सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये ३० हजारांहून अधिक गाणी गायली. ‘एक प्यार का नगमा है’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘एक राधा एक मीरा’ आणि ‘दीदी तेरा देवर दीवाना’ यांसारख्या लोकप्रिय गाण्याना लता मंगेशकर यांनी आवाज दिला.

1947 मध्ये वसंत जोगळेकर यांनी लतादीदींना त्यांच्या ‘आपकी सेवा में’ या चित्रपटात गाण्याची संधी दिली. या चित्रपटातील गाण्यांवरून लतादीदींची खूप चर्चा झाली. यानंतर लतादीदींनी मजबूर चित्रपटातील ‘अंग्रेजी छोरा चला गया’ आणि ‘दिल मेरा तोडा ही मुझे कहीं का ना छोड तेरे प्यार ने’ सारख्या गाण्यांनी स्वतःला सिद्ध केले.

‘आयेगा आनेवाला’ने मिळवून दिली ओळख

तथापि, असे असूनही, लतादीदी अजूनही एक खास हिटच्या शोधात होत्या. 1949 मध्ये ‘महल’ चित्रपटातील ‘आयेगा आनेवाला’ या गाण्यातून लतादीदींना अशी संधी मिळाली. हे गाणे त्या काळातील सर्वात सुंदर आणि लोकप्रिय अभिनेत्री मधुबालावर चित्रित करण्यात आले होते. हा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला आणि लता आणि मधुबाला या दोघींसाठीही हा चित्रपट खूप लकी ठरला. यानंतर लतादीदींनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण, १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण आणि २००१ मध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार, भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  त्यापूर्वी त्या चित्रमहर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या होत्या. त्यांना २००९ मध्ये ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.