कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळी सण साजरा करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी प्रकाशाचा उत्सव म्हणून साजरा केला जावा, आवाजाचा उत्सव म्हणून नाही, असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं आहे. गृह विभागाकडून याबाबत परिपत्रक जारी करुन नागरिकांना यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी सण साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रम आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अशाप्रकारचे कार्यक्रम ऑनलाईन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह द्वारे आयोजित करता येऊ शकतील, असं राज्य सरकारकडून सूचित करण्यात आलं आहे.
दिवाळीच्या मार्गदर्शक सुचना पुढीलप्रमाणे :
- या वर्षी दिवाळी सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
- दिवाळीत प्रदूषण होऊ नये ही बाब विचारात घेऊन फटाके फोडणे टाळावे त्याऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करावी.
- दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन करू नये, करायचे असल्यास ऑनलाइन आणि सोशल मीडिया माध्यमातून कार्यक्रम करावे.
- सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ऐवजी संस्थांनी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिरांवर भर दिला जावा.
- धार्मिक स्थळ अद्याप खुली केलेली नाही, त्यामुळे सण घरगुती पद्धतीने सध्या स्वरूपात साजरा करावा.
- उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.
- कोविड १९ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे संबंधित विविध विभाग तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी वेळोवेळी जारी केलेल्या नियमांचे पालन सर्वांसाठी बंधनकारक असेल.