शेतकरी आंदोलन हिंसाचार : मेधा पाटकर, योगेंद्र यादव, राकेश टिकैत यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल

0
211

प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते मेधा पाटकर, योगेंद्र यादव तसेच राकेश टिकैत यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ ​​लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.

लालकिल्ल्यावर आंदोलकांनी हल्लाबोल केल्यावर तिथे तैनात दिल्ली पोलिसांवर आंदोलकांनी तलवारी आणि दांडपट्टे घेऊन जोरदार हल्ला केला. अवघ्या 40 सेकंदात तब्बल 21 पोलीस किल्ल्याच्या भिंतीवरून 20 ते 25 फूट खोल खाली कोसळले. काही पोलिसांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला तर काही पोलीस खाली कोसळले.

काय घडलं होतं रॅलीत?

काल मंगळवारी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं. शेतकऱ्यांना रॅलीसाठी जो मार्ग आखून दिला होता. त्या मार्गावरून शेतकऱ्यांनी रॅली काढली नाही. शेतकऱ्यांनी वेगळ्याच मार्गाने रॅली काढली होती. शेतकऱ्यांचा एक जत्था गाजीपूर बॉर्डरवरून आयटीओला पोहोचला होता. हा जत्था लाल किल्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करत होता. अक्षरधाम-नोएडा मार्गावर पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांना आऊटर रिंगरोडवरून जाण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या मार्गाने न जाता आंदोलकांनी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. याच दरम्यान शेतकऱ्यांमधून पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली.

योगेंद्र यादव कोण? अटकेची मागणी का?

योगेंद्र यादव हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते स्वराज अभियानचे प्रमुख आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून सध्या या आंदोलनात ते प्रमुख भूमिका पार पाडत आहेत. शेतकरी आंदोलनात त्यांची महत्त्वाीच भूमिका राहिली आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना शांततापूर्ण वातावरणात आंदोलन करण्याचा सल्ला दिला आहे. शेतकरी आंदोलनाला कोणतंही गालबोट लागू नये, हे आंदोलन भरकटू नये म्हणून यादव यांनी सातत्याने काळजी घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवरच या आंदोलनाचा कसा फोकस राहील आणि त्याला राजकीय वळण मिळणार नाही, याची काळजीही त्यांनी घेतली आहे. मात्र, तरीही योगेंद्र यादव यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. यादव यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन दोन महिने तग धरून ठेवलं म्हणून त्यांच्यावरील राग काढण्यासाठी त्यांच्या अटकेची मागणी होत असल्याची चर्चा आहे. यादव हे या आंदोलनामागचे ब्रेन असल्याने त्यांच्या अटकेनंतर आंदोलन भरकटेल म्हणूनही त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. त्याशिवाय कालच्या हिंसेचा चोहोबाजूने तपास व्हावा यासाठी यादव यांच्या अटकेचीही मागणी केली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं.