Farmers Protest India: पॉपस्टार रिहाना पाठोपाठ ग्रेटा थनबर्गकडून शेतकऱ्यांचं समर्थन

0
246

कृषी कायद्यांवरून केंद्र सरकार विरुद्ध शेतकरी असं चित्र सध्या दिल्लीत निर्माण झालं आहे. शेतकरी आंदोलनाला धार आल्यानंतर दिल्लीच्या सीमांना युद्धभूमीचं स्वरूप आलं असून, शेतकऱ्यांच्या नाकेबंदीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. याचे पडसाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले आहेत. इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर तरुण पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गनंही शेतकऱ्यांना पाठिंबा देत आंदोलनात उडी घेतली आहे.

पॉप स्टार रिहाना काय बोलली?

खरं तर, कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली. ही बातमी शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या जागेभोवती इंटरनेट बंद करण्याविषयी होती. रिहानाने ही बातमी शेअर केली आणि लिहिले की, “आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest या हॅशटॅगसह हे ट्वीट केले.

ग्रेटा थनबर्ग काय म्हणाली?

रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत.” ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने ‘पर्सन ऑफ द इयर’ म्हणून घोषित केले होते. ग्रेटा चर्चेत आली होती ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ग्रेटाचा शाब्दिक चकमक झाली होती.

दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाजीपूर या तीन सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त वाढवला आहे. टिकरी सीमेवर रस्त्यावर मोठे खिळे पसरल्यानंतर प्रशासनाने सिंघू सीमेवर सिमेंटच्या सहाय्याने बॅरिकेट्स जोडून भिंत तयार केली आहे. गाझीपूर सीमेवर काटेरी तार बसवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरु आहे तिथे इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे