ब्रिटनमधील नवा कोरोना व्हायरस नियंत्रणाबाहेर; ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना ३१ डिसेंबरपर्यंत बंदी; केंद्र सरकारचा तातडीचा निर्णय

0
351

जगभरातील देश कोरोना विषाणूशी लढत असताना आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळला आहे. हा विषाणू वेगाने पसरत असल्याने सगळेच देश सतर्क झाले आहेत. केंद्र सरकारनेही याची गंभीर दखल घेत ब्रिटन आणि भारतामधील विमान उड्डाणांवर बंदी घातली आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागून होणार आहे.

२२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ही बंदी असणार आहे. युनायटेड किंग्डममध्ये करोना व्हायरसचा नवा प्रकार आढळला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. करोना व्हायरसच्या नवीन प्रकाराचा भारतात प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रिटनच्या शासनाकडून व्हायरसचा हा नवा प्रकार नियंत्रणाबाहेर असल्याचा इशारा देण्यात आल्यानंतर युरोपियन युनियनच्या अनेक राष्ट्रांनी तेथून येणाऱ्या उड्डाणांवर आणि सर्व विमान प्रवासावर बंदी घातली आहे. भारतातही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विमान वाहतूकीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. आता केंद्र सरकारनेही भारत आणि ब्रिटन दरम्यानच्या हवाई प्रवासावर बंदी घातली आहे. 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही बंदी घालण्यात आली आहे.

२२ डिसेंबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत जी विमानं युकेहून मुंबई किंवा भारतात ज्या ठिकाणी येतील त्यातील प्रवाशांना करोना चाचणी करणं आवश्यक असणार आहे. विमान तळांवर युकेहून येणाऱ्या प्रवाशांची RTPCR चाचणी करण्यात येणार आहे असं केंद्र सरकारच्या नागरी उड्डाण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

सरकार सावध आहे, घाबरून जाण्याची गरज नाही : आरोग्यमंत्री हर्षवर्धन
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराच्या (स्ट्रेन) संसर्गाबाबत सरकार सतर्क असून घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की, गेल्या एका वर्षात कोविड -19 ला सामोरे जाण्यासाठी जे महत्वाचे होते, त्या सर्व गोष्टी सरकारने केल्या आहेत.