आंतरराष्ट्रीय स्तरावर दर उतरल्यामुळे भारतीय बाजारात देखील सोन्याचे दर (Gold Rates Today) घसरले आहेत. तुम्ही जर सोनेखरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. आज भारतीय बाजारात सोन्याचे दर 45 हजार प्रति तोळापेक्षाही कमी आहेत. एमसीएक्स (Multi commodity exchange) वर सोन्याचे दर 0.1 टक्क्याने कमी होऊन 44981 प्रति तोळा झाले आहेत. त्याचबरोबर चांदी 1.4 टक्क्यांनी घसरून 66,562 प्रती किलो झाली.
24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायच झाल्यास आज दिल्लीत 10 ग्रॅमची किंमत 48,380 रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत 46,340 रुपये, मुंबईत 44,910 रुपये आणि कोलकातामध्ये 47,210 रुपये इतकी आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याच्या घसरणीसह व्यापार होत आहे. अमेरिकेतील सोन्याचा व्यापार प्रति अंश 5.07 डॉलरने घसरून 1,740.26 डॉलरवर बंद झाला. त्याचबरोबर चांदी 0.50 च्या घसरणीसह 25.74 डॉलरवर आहे.
सोन्याचे दर यावर्षात वाढणार
तज्ञांच्या मते, पुन्हा एकदा या मौल्यवान धातूच्या किंमतीमध्ये तेजी येऊ शकते. भारतात लग्नसराईच्या काळात होणाऱ्या दागिन्यांच्या खरेदीमुळे सोन्या-चांदीच्या किंमतींना आता खरेदीला आधार मिळेल. जर सध्याच्या किंमतींवर सोन्यात गुंतवणूक केली गेली तर ती दीर्घ मुदतीत मोठा नफा मिळण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांचे मत आहे की 2021 मध्ये सोन्याच्या किंमती निश्चितच वाढतील. यावर्षी सोन्याचे दर 63000 प्रति तोळाच्या पातळीवर जातील असा अंदाज आहे. जर असे झाले तर गुंतवणूकदारांना जोरदार नफा मिळण्याची खात्री आहे.