कृषी कायद्याला विरोध करत देशातील शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीच्या वैशीवर पंजाब आणि हरयाणा येथील शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. याच दरम्यान या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलंय. सोबतच देशातील प्रसिध्द कलाकार, साहित्यिक, खेळाडूंनी देखील या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
सोलापूर : दिल्लीत होत असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. बाजार समितीतील अडते, व्यापारी, हमाल, माथाडी कामगार यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय एकत्रित घेण्यात आला आहे.
नाशिक: नाशिक कृषि उत्पन्न बाजार समिती सभापतींनी शेतकऱ्यांना सोमवारी शेतीमालाची तोड करू नये, मंगळवारी बाजार समितीत शेतीमाल आणू नये, देशव्यापी बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन केलं आहे. केंद्र सरकारच्या विधेयका विरोधात बाजार समिती बंद असणार आहे. नाशिक बाजार समिती सभापती माजी खासदार देविदास पिंगळे यांनी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय केला केला आहे.
नवी मुंबई : उद्या नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे. उद्या देशभरात होत असलेल्या संपाला आम्ही पाठिंबा जाहीर केला आहे. उद्या आमचे सर्व माथाडी बांधव देशव्यापी संपात सहभागी होत आहेत. केंद्र सरकारने कृषी आणि पणन कायद्यात केलेल्या बदलामुळे आणि नवीन कायदे केल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या आवारातील व्यापाऱ्यांचा व्यवसाय आणि माथाडीची कामे कमी झाली आहेत याचाच निषेध नोंदवण्यासाठी आम्ही संपाला पाठिंबा दिला आहे, असं माथाडी बांधवांनी सांगितलं आहे.
पुणे : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील चाकण बाजार समिती बंद राहणार आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी समितीने निर्णय घेतला आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव, ओतूर आणि आळेफाटा येथील मार्केट ही बंद राहणार आहेत.
धुळे : उद्याच्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर धुळे, साक्री, पिंपळनेर बाजार समिती बंद राहणार आहे. उद्याच्या भारत बंद मध्ये हमाल मापाडी माथाडी युनियन , महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ पुणे व महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ,पुणे संपात सहभागी होणार असल्यामुळे धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री , पिंपळनेर बाजार समितीचे सर्व कामकाज बंद राहणार आहे.
शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला देशातील अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, बसपा, पीएजीडी, एसीपी, सीपीआई, सीपीएम, सीपीआई (एलएल), आरएसपी, आरजेडी, डीएमके, एआयएफबी, जेएमएम, टीआरएस, आम आदमी पार्टी, राष्ट्रीय लोकशाही पार्टी यामध्ये प्रमुख पक्षांचा समावेश आहे.