National Farmers Day: राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यामागचे कारण काय असेल?

0
459
Detail of growing maize crop and tractor working on the field

भारताचे माजी पंतप्रधान आणि शेतकऱ्यांचे नेते चौधरी चरण सिंह यांच्या जयंती दिवशी म्हणजेच 23 डिसेबंर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवले. हा कार्यकाळ अगदी अल्प असला त्यांनी शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक योजना तयार केल्या. त्यांनी शेतकरी वर्गासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हा दिवस साजरा केला जातो. शेतकऱ्यांच्या हितासाठी चौधरी यांनी भरीव कामगिरी केली.राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांची स्थापना त्यांनी केली. त्यामुळेच अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये 2001 साली चौधरी चरण सिंग यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घोषित करण्यात आला.

आज देशात राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा होत असताना देशभरातील शेतकरी राजाची सध्याची स्थिति, त्यांचा आर्थिक स्तर, सामाजिक पत, त्यांना समाजाकडून मिळणारी वागणूक आदि बाबीचा विचार करणे यानिमित्ताने गरजेचे आहे. सरकारे आली पुन्हा बदलली मात्र शेतकरी राजाची परस्थिती मात्र जैसे थे अश्याच स्वरूपाची असते. राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमिताने शेतकर्यारची आर्थिक ऊंची वाढवण्यासाठी शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल सुचवणे, ते अमलात आणण्यासाठी त्यांना तयार करने व विशेष म्हणजे शेतकरी सद्य स्थितीत भेदरलेल्या व कर्जबाजारी अवस्थेत असल्यामुळे त्याला उभे करण्यासाठी अर्थ पुरवठा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. शेतकरी उभा राहिला तरच देश प्रगतीची शिखरे पार करू शजेल.

कोणत्याही समस्येने जरा ही बळीराजांना-शेतकर्यांना कोणी ग्रासले असेल तर याला आपला मदतीचा हात नक्की मिळाला पाहिजे. समाजातील प्रत्येक घटकांनी याबाबत आपला मदतीचा हात समोर केला पाहिजे हि सध्याची परिस्थिती झाली आहे. सगळ्यांनी अवती-भवती असणाऱ्या शेतकर्यांना त्यांचा स्वाभिमान जराही न दुखावता, हवी तेवढीच आणि तितकीच मदत अगदी स्वेच्छेने केली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या सर्व शासकीय योजना; सोयी-सवलती निव्वळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यापर्यंत पोहोचती पाहिजे. अनेक शेतकरी यांचे शिक्षण अपूर्ण असल्याने त्यांना शासनाच्या योजनांची माहिती होत नाही किंवा शासनाच्या योजनांचा लाभ कसा घायचा हे त्यांना माहिती होत नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन शेतकर्यांपर्यत त्यांच्या फायद्याच्या योजना जरी त्यांच्यापर्यंत पोहचवल्या तरी आपला एकप्रकारे हातभार त्यांना नक्की मिळेल.

यंदाचा शेतकरी दिवस वेगळा

यावर्षी मात्र शेतकरी, खासकरून पंजाब आणि हरियाणा मधील शेतकरी राष्ट्रीय राजधानीच्या सीमेवर आंदोलन करत असताना हा दिवस साजरा केला जात आहे. वेगवेगळ्या शेतकरी संघटना दिल्लीच्या सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करत आहेत.सप्टेंबर मध्ये केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे आणि त्यांच्या ‘दिल्ली चलो’ आंदोलनाचा आज 28वा दिवस आहे.

आज हा दिन साजरा केला जात असतानाच देशातील शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. यंदा शेतकरी आंदोलनातच ‘राष्ट्रीय शेतकरी दिवस’ साजरा करणार आहेत. नव्या कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या शेतकरी संघटना पुढील बातचीतसाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावावर आज निर्णय घेणार आहेत. आज सकाळी सिंघु बॉर्डरवर पुन्हा एकदा बैठक होईल. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठकही होईल. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.