पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांसमोर जोडले हात; शेतकरी आंदोलकांनाही हात जोडून आवाहन

0
444

देशात कृषी विधेयकांविरोधात आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधला. मध्य प्रदेशात एका शेतकरी संमेलनात बोलताना त्यांनी सरकारची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. सरकारने मंजूर केलेली कृषी कायदे हे एका रात्रीत तयार झाले नाहीत, गेल्या 20-22 वर्षांपासून त्यावर चर्चा सुरू होती. आता त्यात राजकारण केलं जात असून केवळ विरोध करण्यासाठी आंदोलन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मध्य प्रदेशमध्ये किसान महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,”मागील अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यांवर चर्चा सुरू आहे. कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारे हे कायदे एका रात्रीत तयार करण्यात आले नाहीत. मागील २०-२२ वर्षांपासून सत्तेत असलेल्या प्रत्येक सरकारनं यावर समग्रपणे चर्चा केली आहे,” असं मोदी म्हणाले.

मी सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो. याचं सगळं श्रेय तुम्ही घ्या. याचं सर्व श्रेय तुमच्या सगळ्या जुन्या निवडणूक जाहीरनाम्यांना देतो. मला शेतकऱ्यांचे कष्ट कमी करायचे आहेत. मला त्यांची प्रगती करायची आहे. कृषी क्षेत्रात आधुनिकता आणायची आहे,” असं म्हणत मोदी यांनी सर्व पक्षांना आवाहन केलं.

आज देशातील सर्वच राजकीय पक्षांचे जुने जाहीरनामे बघितले. त्यांची जुनी भाषणं ऐकली. जे कृषि मंत्रालय सांभाळत होते, त्यांची पत्र वाचली तर आज कृषी क्षेत्रात जे बदल करण्यात आले आहेत. ते वेगळे नाहीत. आमचं सरकार शेतकरी समर्पित असून, आम्ही फाईलींच्या ढिगाऱ्यात फेकण्यात आलेल्या स्वामीनाथन आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि शिफारशी लागू केल्या. हमीभावात दीड टक्क्यांनी वाढ केली,” असं म्हणत मोदी यांनी विरोधकांवर शरसंधान साधलं.

असं केलं पंतप्रधानांनी ट्वीट
“कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं,” असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पत्रामध्ये केंद्र सरकारने आपण शेतकऱ्यांसोबत खुलेपणाने चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. पण सोबतच विरोधकांच्या अजेंड्याचं मनोरंजन करणार नाही यावरही जोर दिला आहे. तर विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप करताना सरकारने म्हटलं आहे की, “गेल्या २० ते २५ वर्षात कोणत्याही शेतकरी नेता किंवा संघटनेचं वक्तव्य दाखवा ज्यांनी शेतकऱ्यांना आपल्या मालाचा योग्य भाव मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे”.