रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक: काय आहे नेमकं अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण?

0
370

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अर्णब यांच्या अटकेमुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या प्रकरणावर टाकलेली ही नजर…

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?

अन्वय नाईक यांनी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी अन्वय यांच्या आई कुमुद नाईक यांचाही मृतदेह आढळला होता. अन्वय नाईक हे पेशाने आर्किटेक्ट होते. अन्वय हे कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे संचालक होते. अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप करत त्यांना आपल्या आत्महत्येला जबाबदार धरलं होतं.

अन्वय नाईक यांच्या कंपनीनं अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्हीचा स्टुडिओ उभारला होता. या कामाचे पैसे रिपब्लिकन टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांनी थकवलेय आणि त्यामुळं आपल्या पतीने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप अन्वय यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी केला आहे.

अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर पत्नी अक्षता यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात अर्णब गोस्वामी यांच्यासह तिघांच्या विरोधात तक्रार दिली. अलिबाग पोलिसांनी याप्रकरणी कुठलीही कारवाई केली नाही असा आरोप देखील अक्षता यांनी केला होता. 5 मे 2020 रोजी अक्षता यांनी सोशल मीडियावर याप्रकरणी एक सविस्तर व्हिडीओ प्रसारित केला आणि आपल्या पतीच्या आत्महत्येला दोन वर्षांनंतर देखील न्याय मिळत नाही त्यामुळे न्याय देण्याची मागणी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी केली होती.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येआधी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्रकार अर्णब गोस्वामी यांचं नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. शिवाय, अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनीही हा आरोप केला आहे.

पण अर्णब यांच्या वृत्तवाहिनीच्या प्रवर्तक कंपनीने एक पत्रक जारी करून अक्षता नाईक यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.