२५ हजार बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार; शरीफ चाचां”चा पद्मश्री पुरस्कारने सन्मान

0
273

हजारो बेवारस मृतदेहांना अखेरचा सन्मानजनक निरोप देणाऱ्या अयोध्येतील ‘शरीफ चाचा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेवक मोहम्मद शरीफ यांना सोमवारी ‘पद्मश्री’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शरीफ चाचांनी हा पुरस्कार स्वीकारला. बेवारस मृतदेहांचा प्रश्न आज देशभरात गंभीर बनतोय. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्य़ाचे नातेवाईक मृतदेह घेण्यास न आल्याने विविध रुग्णालयांमध्ये मृतदेह कित्येक दिवस पडून राहतायत. कोरोना काळात तर ही परिस्थिती अधिकच भीषण होती. मात्र कोरोना, ऊन-पाऊस कशाचीही तमा न बाळगता हजारो बेवारस मृतदेहांना अयोध्येतील शरीफ चाचा अर्थात समाजसेवक मोहम्मद शरीफ यांनी अखेरचा सन्मानजनक निरोप दिला. शरीफ चाचांच्या याच समाजकार्याची दखल देत त्यांना देशातील सर्वोच्च पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी दिल्लीत शरीफ चाचांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

शरीफ चाचांनी गेली २५ वर्षे जाती-भेद न पाळता जवळपास २५ हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहे. त्यामुळे बेवारस मृतदेहांचा ‘मसीहा’ म्हणून शरीफ चाचांना ओळखले जाते. शरीफ चाचांना पद्मश्री पुरस्काराच्या निवडीचे पत्र २०२० साली मिळाले होते. परंतु कोरोनामुळे हा पुरस्कार त्यांनी काल स्वीकारला.

मुलाच्या मृत्यूनंतर घेतला शरीफ चाचांनी समाज कार्याचा वसा
१९९३ मध्ये शरीफ चाचांचा तरुण मुलगा मोहम्मद रईस याचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला. मात्र अपघातानंतर कुटुंबियांना वेळीच माहिती न मिळू शकल्याने रईस यांच्या मृतदेहावर बेवारस म्हणून अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे शरीफ चाचा पुरते कोलमडले होते. मात्र यातून त्यांनी समाजसेवेचा वसा हाती घेतला. अयोध्येत कोणाचाही मृतदेह यापुढे बेवारस म्हणून अंत्यसंस्कार होणार नाहीत मग तो मृतदेह कोणत्याही जाती किंवा धर्माचा असो, असा निश्चय त्यांनी केली. तेव्हापासून शरीफ चाचा प्रत्येक बेवारस मृतदेहावर त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरेनुसार अत्यंसंस्कार करत आहेत. यामुळे शरीफ चाचा आजच्या आधुनिक भारतातील सर्वांसाठी नवा आदर्श आणि प्रेरणा स्थान बनले आहेत.