(“प्रवासी रोजगार” हे आहे अॅपचे नाव)
बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने लॉकडाउन जाहीर झाल्यापासून सातत्याने स्थलांतरित गरीब मजुरांची गावी पोहोचवण्याची व्यवस्था केली. त्याच्या मदतीचा ओघ अजूनही सुरूच असून आता त्याने स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली आहे. आता तो मजुरांना नोकर्या मिळवून देण्यासही मदत करणार आहे. यासाठी सोनूने ‘प्रवासी रोजगार’ नावाचे एक अॅप सुरू केले आहे. जे स्थलांतरितांना नोकरी शोधण्यासाठी माहिती आणि योग्य लिंक प्रदान करेल. सोनूने आपल्या ट्विटर हँडलवर ही माहिती शेअर केली आहे.
याबाबत बोलताना “हे काम सुरू करण्यासाठी किंवा हे पाऊल उचलण्यासाठी गेले अनेक दिवस मी प्लॅनिंग करत होतो, त्यावर विचार करत होतो. या कामानिमित्त समाजातील अनेक क्षेत्रांतील लोकांशी माझे बोलणे सुरू होते. यासंदर्भात अव्वल संस्थांशी व्यापक चर्चा झाली आहे. स्वयंसेवी संस्था, परोपकारी संस्था, सरकारी अधिकारी, रणनीती सल्लागार, तंत्रज्ञान स्टार्टअप्स आणि सर्व प्रवाशांना ज्यांना त्यांच्या घरी पोहोचवले त्या सर्वांशी चर्चा झाली असल्याचं तो म्हणाला.
विविध क्षेत्रांतील सुमारे 500 कंपन्या या पोर्टलवर बांधकाम, परिधान, आरोग्य, अभियांत्रिकी, बीपीओ, सुरक्षा, वाहन, ई-कॉमर्स आणि लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देतील. तसेच हे अॅप कामगारांना काही मूलभूत प्रशिक्षणासह इंग्रजी कसे बोलायचे ते देखील शिकवेल. सध्या इंग्रजीमध्ये असणारे हे APP लवकरच 5 भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे कामगारांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झाल्यास काही गोष्टी सुखकर होतील. हे अॅप विनाशुल्क आहे. या सेवेची सुरुवात 23 जुलैपासून होत आहे.
लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित, गरीब मजुरांसाठी सोनू सूद ‘देवदूत’ म्हणून मदतीला धावून आला आहे. त्याच्या या कामाचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. अभिनेता सोनू सूदने आतापर्यंत बर्याच लोकांना सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवले आहे. त्याचप्रमाणे त्याने मुंबई पोलिसांना देखील 25000 फेस शिल्डची मदत केली होती. अलीकडेच सोनू सूदने केलेल्या मदतीमुळे एका प्रवासी मजुराने सोनू सूदच्या नावाने वेल्डिंगचे दुकान उघडले.
https://t.co/1sPkKZmz3T