सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा पदक

0
276

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचणारा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला आता परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने ३८४ जणांना शौर्य पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. याच यादीत नीरज चोप्रालाही स्थान मिळाले आहे.

टोकियो ऑलम्पिक विजेता नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला नीरज चोप्राला सन्मानित करण्यात येणार आहे. नीरज भारतीय लष्कराच्या राजपुताना रायफल्समध्ये तैनात आहे. आतापर्यंत नीरजला अनेक सन्मान मिळाले आहेत.

ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५७ मीटर अंतरावर भालाफेक करून पदक जिंकले आहेत. मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्काराने नीरजला सन्मानित करण्यात आले आहे. तसेच ३८४ जणांसाठी वीरता पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांमध्ये १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा मंडळ, ४ उत्तम युद्ध सेवा मंडळ, ५३ अति विशिष्ट सेवा मंडळ आणि १३ युद्ध सेवा मंडळाचा समावेश आहे.

नीरज चोप्रा सध्या भारतीय लष्करात नायब सुभेदार या पदावर आहे. तो मूळचा हरियाणातील पानिपत येथील आहे. 2016 च्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजने 82.23 मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते. यानंतर 2017 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्याने भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीरजने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत 86.47 मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले.

परम विशिष्ट सेवा पदक (PVSM) हा भारताचा लष्करी पुरस्कार आहे. शांतता आणि सेवेच्या क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्रादेशिक सेना, सहाय्यक आणि राखीव दल, नर्सिंग अधिकारी आणि नर्सिंग सेवांमधील इतर सदस्यांसह भारतीय सशस्त्र दलातील सर्व श्रेणीतील कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र असतात.

भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या नीरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत पाच मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. नीरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. तेव्हापासून त्याच्या कामगिरीत सातत्य राहिले आहे.