१५ जानेवारी हा दिवस ‘सैन्य दिन’ म्हणून का साजरा केला जातो?

0
364

आज भारतामध्ये सैन्य दिन साजरा केला जात आहे. दर वर्षी भारतीय लष्कराकडून १५ जानेवारी हा दिवस सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय लष्कराचे पहिले कमांडर-इन-चीफ बनलेल्या कोडनडेरा मडप्पा करियप्पा (के. एम. करिअप्पा) यांनी ब्रिटिश राजवटीत भारतीय सैन्याचा अखेरचा ब्रिटिश सर्वोच्च कमांडर जनरल रॉय फ्रान्सिस बुचर याच्याकडून हा अधिकार घेतला. कॅरियप्पा हे देशातील पहिले कमांडर-इन-चीफ झाले होते. 15 जानेवारी 1949 रोजी त्यांनी हा पदभार घेतला होता म्हणून हा दिवस ‘आर्मी डे’ म्हणून साजरा केला जातो.

आपल्या भारतीय सैनिकांचे आभार मानावे तेवढे कमीच. सैनिक केवळ देशाच्या सीमारेषेचे संरक्षण करत नाहीत. तर त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या काळातही जवान सर्वसामान्य नागरिकांची मदत करतात. तेव्हा त्यांच्या त्यागाची दखल घेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी आजच्या दिवसाएवढा महत्त्वाचा दिवस दुसरा कोणताच ठरू शकत नाही. कारण आज आहे भारतीय सैन्य दिन. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. पण देशाच्या संरक्षणाची सूत्रे भारतीयांच्या हाती येण्यासाठी १५ जानेवारी १९४९ हा दिवस उजाडावा लागला. त्या दिवशी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून देशाची सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटिश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी ही सूत्रे स्वीकारली होती. या ऐतिहासिक दिनाची आठवण म्हणून १५ जानेवारी हा दिवस भारतीय सशस्त्र सेना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

१२५ कोटी नागरिकांना शांततेत राहता यावे यासाठी भारतीय सैन्य स्वतःचा जीव धोक्यात घालतात. भारतीय सैन्याचा इतिहास गौरवशाली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत भारत अनेक युद्धजन्य परिस्थिती आणि युद्धांना सामोरे गेला आहे. यामध्ये चीन आणि पाकिस्तान सोबत झालेले युद्ध, कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेली घुसखोरी या सर्वांचा भारतीय जवानांनी मोठ्या धाडसाने सामना केला. स्वातंत्र्योत्तर काळात देशात शांतता नांदावी यासाठी सुद्धा भारतीय सैन्याने मोलाची कामगिरी बजावली. केवळ युद्धजन्य परिस्थितीतच नाही. तर हिमालयातील गोठविणारी थंडी, थरच्या वाळवंटाची उष्णता आणि ईशान्येतील दाट जंगल या सर्व परिस्थितीत सैन्याला रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमांचे रक्षण करावे लागते.

कसा साजरा करतात हा दिवस ?
कोणत्याही सामान्य भारतीयांसाठी ‘आर्मी डे’ राष्ट्रीय सणापेक्षा कमी म्हटले जाऊ शकत नाही. या खास निमित्ताने नवी दिल्लीतील 15 करियप्पा परेड मैदानावर सैन्य दलातून परेड काढली जाते. भारतीय सैन्याच्या तुकडी सैन्यप्रमुखांना गार्ड ऑफ ऑनर देतात. यानंतर भारतीय लष्कराच्या म्युझिक बँडने त्यांचे सादरीकरण केले जाते.

अजून एक गोष्ट आपण अशी करू शकतो आपल्या आजूबाजूला कधीही कोणी सैनिक दिसला तर त्याला एक सॅल्यूट आणि धन्यवाद नक्की म्हणा जेणेकरून आपण सर्व त्यांच्यावर किती प्रेम करतो हे समजेल आणि त्यांचे मनोबल वाढेल.