Maharashtra Bhushan: आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

0
291

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिला जाईल. अखेर ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदी मान्यवर उपस्थित होते. आशा भोसले यांना हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

आशा भोसले यांनी गाण्याच्या माध्यमातून अनके दशकं मराठी तसेच देशवासियांच्या मनावर राज्य केले. अजूनही त्यांची गीतं तेवढ्याच तन्मयतेने आणि अभिरूचीने ऐकली जातात. मराठी, हिंदी तसेच इतर अनेक भाषांत त्यांना गायन केले. यापैकी मराठी भाषेतील त्यांनी गायलेली ‘मलमली तारुण्य माझे’, ‘केव्हातरी पाहाटे’, ‘बुगडी माझी सांडली गं’, अशी काही गीतं रसिकांना प्रचंड आवडली. घरातच गायकी असल्यामुळे गाणं शिकण्याची संधी त्यांना घरातूनच मिळाली. आशाताई यांनी आजवर हिंदीसह अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गायली आहेत. प्रादेशिक भाषांवर असलेलं त्यांचं प्रेम वेळोवेळी रसिकांपर्यंत पोहोचलंच आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनलही सुरू केलं होतं. तरुण गायकांसाठी काहीतरी करावं असं त्यांना वाटत होतं. त्यातून युट्यूबचा विचार पुढे आल्याचं त्या म्हणाल्या होत्या.

आशा भोसले यांना मिळालेले पुरस्कार

  • ५ मे २००८ रोजी पद्मविभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं.
  • २००० मध्ये भारतीय सिनेमातील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.