मिशन बिगिन अंतर्गत राज्यात 31 जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

0
204

राज्यात करोनामुक्तांचं प्रमाण वाढत असलं तरी नवीन करोना स्ट्रेनचं संकट अद्यापही राज्यावर आहे. भारतात करोनाच्या नव्या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. राज्यात नवीन करोना स्ट्रेनचा अद्याप एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारी म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याचंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने मिशन बिगीन अंतर्गत निर्बंध शिथील केले असले तरी काही गोष्टींना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. यामध्ये मुंबई लोकलचाही समावेश आहे. मुंबई लोकल लवकरच सुरु होईल असं सांगितलं जात असलं तरी अद्याप याबद्दल कोणताही निर्णय झालेला नाही. त्यातच आता राज्य सरकारने राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सध्या असलेले निर्बंध कायम राहतील असं स्पष्ट केलं आहे.

राज्यात आत्तापर्यंत मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात यावं, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

यापूर्वी गेल्या 30 सप्टेंबर आणि 14 ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रणाणे सुरु राहणार आहेत. मात्र कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. यंदा नागरिकांनी घराबाहेर न पडता घरच्या घरी साधेपणानेच नववर्षाचे स्वागत करा, असे या मार्गदर्शक सूचनेत नमूद करण्यात आले आहे.