(राज्य सरकारने मिशन बिगिन अगेनचा पुढचा टप्पा कसा असेल, हे स्पष्ट करणारे दिशानिर्देश जारी केले आहेत. यात अनेक नव्या सवलती देण्यात आल्या आहेत.)
महाराष्ट्रात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असून १ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘ मिशन बिगिन अगेन ‘च्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
‘मिशन बिगिन अगेन ३’ नुसार नव्याने शिथिलतेचे नियमही कायम राहणार आहेत. सरकारी आणि खासगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती आधीच्या नियमांप्रमाणेच असणार आहे. तसेच काही आऊटडोअर खेळांना आणि माॅल्समधील दुकानांना ५ ॲागस्टपासून परवानगी देण्यात आलेली आहे.
क्रीडा प्रकारांना अनुमती –
काही क्रीडा प्रकारांना मात्र अनुमती दिली आहे. त्यात असांघिक (वैयक्तिक) खेळ असतील. गोल्फ कोर्स, फायरिंग रेंज, टेनिस, बॅडमिंटन, मल्लखांब व आऊटडोर जिमनॅस्टिक यांना परवानगी दिलेली आहे. रेस्टॉरन्ट सुरू करण्याची जोरदार मागणी मालकांनी केली असली तरी ती मान्य झालेली नसल्याने रेस्टॉरन्ट सुरू होण्यास प्रतीक्षाच करावी लागेल. मात्र होम डिलिव्हरीची परवानगी कायम असेल.
टॅक्सी व कॅबमध्ये चालक आणि ३ प्रवासी, रिक्षात चालक आणि दोन प्रवासी, चार चाकी वाहनात चालक अधिक ३ जणांना प्रवासाची मुभा आता असणार आहे. दुचाकीवर दोन जण आता जाऊ शकणार आहेत. या दोघांनीही हेल्मेट व मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. सर्व प्रकारच्या प्रवासात मास्क सक्ती असेल, असेही पुढे नमूद करण्यात आले आहे.
मिशन बिगिन अगेन, आणखी काय काय सुरू होणार?
1. मॉल्समधील दुकाने आणि रेस्टॉरंट्स सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार
2. मॉलमधील रेस्टॉरंट्स, फूड कोर्ट सुरू झाले तरी फक्त होम डिलिव्हरीची परवानगी
3. टीमची गरज नसलेल्या खेळांना परवानगी गोल्फ, बॅडमिंटन, जिम्नॅस्टिक्स, मल्लखांब यासारख्या खेळांना परवनागी
4. जिम, योगा क्लासेस सुरू होणार पण स्विमिंग पूल तूर्तास बंद राहणार
5. टू व्हिलरवर दोन जणांना परवानगी (फक्त अत्यावश्यक कारणासाठी)
6. रिक्षा – 1 + 2 (फक्त अत्यावश्यक कारणासाठी)
7. फोर व्हिलर – 1 + 3 (फक्त अत्यावश्यक कारणासाठी)
याशिवाय आधी ज्या व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे ते सुरूच राहणार आहेत. पण सर्व ठिकाणी मास्क तसंच सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. पण यात रेल्वे आणि मेट्रो सेवा अजूनही बंद राहणार आहे. तर शाळा, कॉलेजेससुद्धा बंद राहणार आहेत. इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी कायम आहे