राज्यात अनलॉक-४ ची नियमावली: ई-पासची कटकट अखेर संपली

0
300

राज्य सरकारकडून अनलॉक ४.० च्या मार्गदर्शक सूचना सोमवारी सायंकाळी जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. २ सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरू होत असून खासगी बस, मिनी बस, खासगी प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली असून जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे.

मिशन बिगीन अगेनअंतर्गत अनेक बाबींमध्ये सुट देत व अर्थचक्रास गती देण्यासाठी 2 सप्टेंबर 2020 पासून खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कोणत्याही निर्बंधाशिवाय यापुढे आऊटडोर किंवा खुल्या जागेमध्ये व्यायाम आदी कार्ये करता येतील. हॉटेल (उपहारगृहे )आणि लॉज (निवासगृहे) यांना 100 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तथापी, खाजगी बसेसमधून प्रवासी वाहतूक, हॉटेल, लॉजेसचे कार्यान्वयन याबाबत स्वतंत्र कार्यप्रणाली (स्टँडर्ड ओपरेटिंग प्रोसिजर) जारी करण्यात येणार आहे

. चारचाकीत चालकासह ४ जणांना मुभा

टॅक्सी, कॅबमध्ये आता १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकी मोटारीत १ अधिक ३ आणि दुचाकीवर १ अधिक १ अशा वाहतुकीस परवानगी असणार आहे. ६५ वयावरचे वरिष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि १० वर्षांच्या आतील बालके यांना सार्वजनिक ठिकाणी नेण्यास प्रतिबंध आहे.

वाहतुकीसाठी स्वतंत्र नियमावली

जिल्ह्याबाहेर खासगी प्रवासी वाहतूक किंवा मालवाहतूक करण्यासाठी किंवा आंतरराज्य प्रवासासाठी कोणतीही बंधने असणार नाहीत. ई-पासची अट आता नसेल. मात्र, जिल्ह्याबाहेर वाहतुकीसाठी परिवहन विभाग स्वतंत्रपणे सुनिश्चित पद्धती आखून देणार आहे.

२ सप्टेंबरपासून काय सुरू होणार?

  • हॉटेल आणि लॉज पूर्णपणे सुरू करायला परवानगी, पण त्यासाठीची नवी नियमावली दिली जाणार
  • खासगी तसंच मिनी बसना परवानगी
  • खासगी ऑफिस ३० टक्के कर्मचारी संख्येवर काम करु शकतील
  • प्रवासी आणि मालाच्या आंतरराज्य प्रवासासाठी ई-पासची गरज नाही

बार, माॅल्स, थिएटर, जिम बंदच :

  1. जिम व मंदिरांचा निर्णय नाही.
  2. प्रतिबंधित क्षेत्रात व्यवहारांना बंदी.
  3. महानगरपालिका क्षेत्रातील कर्मचारी उपस्थितीचा निर्णय स्वतंत्र जारी होणार.
  4. बार, माॅल्स, थिएटर्स यांना अनुमती नाही.
  5. शाळा, महाविद्यालये ३० सप्टेंबरपर्यंत बंद.
  6. लग्नास ५०, तर अंत्यविधीस २० लोकांना उपस्थित राहता येणार.
  7. गर्दीच्या कार्यक्रमांवर बंदी कायम.