मिशन बिगेन अगेन:राज्यात उद्यापासून ग्रंथालय सुरु; मेट्रोही धावणार

0
423

महाराष्ट्र मिशन बिगन अगेनच्या दिशेने वाटचाल करत असताना आणखी एक आनंदाची बातमी नागरिकांसाठी राज्य सरकारने दिली आहे. राज्यात गुरूवार, उद्यापासून ग्रंथालये सुरू करण्यात ठाकरे सरकारने परवानगी दिली असून नुकतेच सरकारने यासंबंधीचे नवे आदेश जारी केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पुस्तकप्रेमींसाठी ही दिलासादायक बाब आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ग्रंथालये सुरू करण्याची मागणी होत होती.

राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी ग्रंथालये उद्यापासून सुरू करण्यासही राज्य सरकारने परवानगी दिली आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रंथालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे, नियमितपणे सॅनिटेशन करावे, असे नमूद करण्यात आले आहे. यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाची मार्गदर्शक तत्वे लागू असतील असेही सांगण्यात आले आहे. कंटेन्मेंट झोन वगळून अन्य भागांत व्यापार प्रदर्शनांनाही परवानगी देण्यात आली आहे. याबाबत उद्योग विभागाची मार्गदर्शक तत्वे पाळावी, असे नमूद करण्यात आले आहे.

राज्यात अनेक ठिकाणी आठवडा बाजार भरत असतात. हे बाजार लॉकडाऊन दरम्यान गेल्या सात महिन्यांपासून बंदच आहेत. ‘ अनलॉक ‘च्या पाचव्या टप्प्यात या बाजारांना दिलासा मिळाला आहे. उद्यापासून हे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. अनेक छोट्या शहरांमध्ये जनावरांचेही बाजार भरतात. ते सुरू करण्यासही अनुमती देण्यात आली आहे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियम लागू असणार आहेत.

‘अनलॉक-५’मध्ये सरकारने बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि मॉल यांना उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर ग्रंथालयं सुरु करण्याची मागणी होत होती. त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार राज्यभरातील ग्रंथालयं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. याशिवाय, कन्टेनमेंट झोनबाहेरील आठवडी बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यामध्ये कन्टेनमेंट झोनबाहेरील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था 31 ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान शाळांना 50 टक्के शिक्षक तसेच इतर कर्मचाऱ्यांना ऑनलाइन शिक्षण याशिवाय इतर कामांसाठी शाळेत बोलावण्याची परवानगी देण्यात आली आहे.