अनाथांचा आधार असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी ह्दयविकाराच्या झटक्याने मंगळवारी पुण्यात निधन झाले. पुण्याच्या कोथरूड येथील गॅलेक्सी हॉस्पिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री ८ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर हर्नियाचे ऑपरेशन झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर ह्दयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. नुकताच पद्मश्री पुरस्काराने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते.
कोण होत्या सिंधुताई सपकाळ?
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म वर्धा येथे झाला. घरात मुलगी नको असताना त्यांचा जन्म झाल्याने त्यांच्या वाट्याला उपेक्षाच आली. त्यांना मराठी शाळेत चौथीपर्यंतच शिकता आलं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न करून देण्यात आलं. मात्र, त्यानंतरही त्यांचा संघर्ष सुरूच राहिला.
पुढे सिंधुताई यांनी१९९४ मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण गावात ममता बाल सदन संस्था सुरू केली. स्वतःची मुलगी ममताला त्यांनी दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून सेवासदन येथे शिक्षणासाठी दाखल केले. तसेच स्वतः इतर अनाथ आणि बेवारस मुलांचा सांभाळ करत आधार दिला. या ठिकाणी त्यांनी लहान मुलांच्या पालनपोषणासह शिक्षणाचीही जबाबदारी स्विकारली.
सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेकडून अनाथ मुलांना जेवण, कपड्यासह इतर अनेक सुविधा दिल्या जायच्या. या कामासाठी लोकही सढळ हाताने मदत करायचे. याशिवाय मुलांना शिक्षण पूर्ण झाल्यावर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी देखील मार्गदर्शन केले जात होते. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्यावर या अनाथ मुलांना जोडीदार शोधणे आणि लग्न करणे यातही सिंधुताई सपकाळ यांचा सक्रीय सहभाग होता.
पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. अनाथ, बेवारस मुलांना सांभाळतानाच त्यांना शिक्षण, अन्न, कपडे देण्यास त्यांनी सुरुवात केली. या संस्थेत 1 हजार 50 मुले या राहिलेली आहेत. त्यांनी पुण्यात बाल निकेतन, चिखलदरा येथे सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्ध्यात अभिमान बाल भवन, गोपिका गाईरक्षण केंद्र, सासवडमध्ये ममता बाल सदन आणि पुण्यात सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्थेची स्थापना केलीय.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे.
सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला ‘मी सिंधुताई सपकाळ’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.