Unlock 6: राज्यात ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गतचे निर्बंध ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार

0
240

राज्यात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेले निर्बंध ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. या काळात शासनाने दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांची कठोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे महाविकास आघाडी सरकारने स्पष्टे केले आहे. केंद्रापाठोपाठ राज्य सरकारकडूनही अनलॉक ऑक्टोबर गाईडलाईन्सला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी केंद्रीय गृह मंत्रालयाने अनलॉक 6 साठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. त्याअंतर्गत अनलॉक 5 मधील गाईडलाईन्स 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने अनलॉक करताना जीम, ग्रंथालये, उद्याने तसेच रेल्वे सेवा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यास परवानगी दिली. असे असले तरी अद्यापही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. त्यामुळे लॉकडाऊनअंतर्गत लागू केलेल्या तरतुदी ३० नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

कोविड नियम पाळून 100 लोकांच्या उपस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम करण्याची मुभा देण्यात आली आहे. अनलॉक 5 मध्ये, थिएटर, शाळा, राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम आणि इतर कार्यक्रमांना अटीसह सूट देण्यात आली होती. स्विमिंग पूल बंदच राहणार आहेत.

राज्यातील अनेक सेवा आणि व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू झाले असले, तरी कंटेनमेंट झोन आणि करोना उद्रेक झालेल्या ठिकाणी लॉकडाउन कायम ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझेशन हे नियम पाळावेच लागणार असून पुन्हा एकदा ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवली आहे. लॉकडाउनची मुदत वाढवताना मिशन बिगिन अंतर्गत परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी व सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील, असे सांगण्यात आले आहे.

राज्ये/केंद्रशासित प्रदेश स्थानिक पातळीवर, कंटेनमेंट झोनबाहेर केंद्र सरकारशी सल्लामसलत केल्याशिवाय लॉकडाऊन लागू करु शकणार नाहीत. राज्यांतर्गत आणि आंतर-राज्य प्रवासी अथवा मालवाहतुकीवर निर्बंध नाहीत. अशाप्रकारच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र परवानगी/मंजूरी/ई-परमिटची आवश्यकता नाही.